मुंबई - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत नाहीतर त्यांची औकात काय आहे? शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना बसवलं गेलंय. शिवसेनेला फोडा, संपवा हे भाजपाचं जुनं स्वप्न आहे. त्यांनी बरेच प्रयत्न केले परंतु यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमचे काही माणसं फोडून नवीन सरकार बनवलं. आता आमच्यात लोकांना एकमेकांसमोर उभं करून मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपा करतंय असा आरोप संजय राऊत यांनी करत भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंची काही ताकद नाही. शिंदेंसोबत ४० लोक गेलेत, ते शिवसेना नाही. खरी शिवसेना काय हे मुंब्र्यात दिसलं, उद्धव ठाकरे जेव्हा तिथे गेले तेव्हा संपूर्ण मुंब्रा, ठाणे रस्त्यावर आले ती खरी शिवसेना आहे. जर तुम्ही मुख्यमंत्री नसता, पोलिसांचा वापर केला नसता किंवा दिवाळी नसती तर त्या शाखेचा ताबा आमच्याकडे असता. परंतु दिवाळीत वातावरण बिघडू नये असं आम्हाला वाटलं, उद्या हेच पोलीस आमचे आदेश मानतील तेव्हा काय कराल? एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक ही शिवसेना नाही तर गँग आहे, चोरांची टोळी आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.
तसेच, ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा, फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल, भाजपाने तुमचा बार उडवला आहे. ३१ डिसेंबरनंतर बोलावे. भाजपाच्या गुलामांनी, दिल्लीतल्या चरणदासाने मराठी माणसांची, महाराष्ट्राची बेअब्रू केलीय त्यांनी शिवसेनेला ज्ञान पाजळू नये. मुंब्रा इथं गेलो, हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते, पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे सत्ता आणि पोलीस नसते तर चित्र वेगळे दिसले असते. दिवाळी आहे आम्ही संयम पाळला त्यासाठी उपकार मानले पाहिजे असं टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
दरम्यान, आम्ही कायदेशीर लढाई करतोय, दोन जण भांडणे करतील आणि तिथे जाऊन आपण आपले काम करू ही भाजपाची नीती आहे. फोडा आणि राज्य करा हा भाजपाचा विचार आहे. राष्ट्रवादाचा विचार नाही. जातधर्माच्या आधारे देश आणि राज्ये फोडायची आणि सरकार चालवायचा हे भाजपाचे काम आहे. भाजपा काय आहे? त्यांच्याकडे काय विचार आहे? एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपा विचाराचे प्रचारक आहेत? सत्ता आणि पैसा, आपापल्या उद्योगपतींना धनाढ्य बनवणे आणि लोकांना गरीब बनवणे हा भाजपाचा विचार आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.