मुंबई - जामीन मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव, या ना त्या मार्गानं न्यायालयांवर दबाव असं करून कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं. २०२४ नंतर उलटं चक्र सुरू होईल तेव्हा तुम्ही प्रश्न विचारू नका. तुम्ही जो मार्ग स्वीकारताय त्या मार्गानं आम्हालाही जाता येते असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, सुरुवात तुम्ही केली आहे. अंत आम्ही करू.५ राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझारोम पण ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल त्यावर चर्चा करण्यापेक्षा ३ डिसेंबरला निकाल लागतील त्यावर बोलू.पण या ५ राज्यातील परिवर्तनाची दिशा २०२४ ला दिल्लीतील सत्ता परिवर्तनाकडे जाणार आहे. ज्यारितीने राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसनं वादळ निर्माण केले आहे ही २०२४ च्या परिवर्तनाची झलक आहे. काटे की टक्कर होतेय हीच मोठी गोष्ट आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा त्यांनी केली होती. परंतु राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधानांना ८-८ दिवस एका राज्यात राहावे लागतंय. देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरावं लागतंय. २०२४ ला काँग्रेसमुक्त नसून तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे त्याची हवा आहे. राजस्थानासह ४ राज्यात काँग्रेस पक्षाचे, इंडिया आघाडीचं सरकार बनेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
प्रफुल पटेलांच्या गौप्यस्फोटावर निशाणा
२००४ मध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी युती होणार होती. परंतु महाजन-ठाकरेंमुळे ही युती झाली नाही असं प्रफुल पटेल यांनी दावा केला होता.त्यावर संजय राऊतांनी सांगितले की, २००४ च्या घडामोडी, पडद्यामागे काय घडले, २००९, २०१४ आणि २०१९ ला काय झाले हे सोडून द्या. आज काय आहे त्यावर बोला. शरद पवार हे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. ते भाजपासोबत जातील असं मला वाटत नाही.आता फुटून गेलेले लोक असतात काहीही आरोप करतात. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही, कधी घडल्या नाहीत त्यावर हवेत गोळीबार करत राहतात. धुराची वलय सोडत बसा असा निशाणा राऊतांनी पटेलांवर साधला आहे.