जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराणेशाहीविरोधातील भूमिकेवर ठाकरेंनी टीका केली. याचबरोबर पंतप्रधानांचा जवळचा मित्र जगातील दोन नंबरचा श्रीमंत कसा झाला, असा सवालही केला.
मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे का? उद्धव ठाकरेंचे पाचोऱ्यातून आव्हान
आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. मी घरी बसून सरकार चालविले, मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण करून करू शकणार नाही. मी घरी बसून केले म्हणून ही माणसे आज आलीत. घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला.
लवकरच निवडणुका लागतील. या गद्दाराला गाडायचे आहे. मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडले. मविआला तीन वर्षे झाली. कधी हिंदुत्व सोडले हे दाखवून द्या, मी आता हे व्यासपीठ सोडून जाईन. मुख्यमंत्री म्हणून मला शपथ घ्यावी लागली. आमदारांनाही घ्यावी लागते. हे लोक कोरोनात मंदिरे उघडा म्हणून थाळ्या आपटत बसले होते. मी हिंदुत्व सोडणार नाही, माझे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही. भाजपाने त्यांचे हिंदुत्व कोणते ते सांगावे. त्याना आगापिछा काहीच नाही, अशी टीका ठाकरेंनी केली.
एकनाथ खडसेंनी २०१४ मध्ये सांगितले होते, शिवसेनेशी आता युती होऊ शकत नाही. संपलेय सगळे. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते, तेव्हा त्यांच्या गळ्यात हे टांगले गेले. भाजपाला तेव्हा शिवसेना नको होती. शिवसेना संपवायची होती. माझ्याकडे हा जो समोर दिसतोय हा पक्ष आहे. भारतात भाजपाशिवाय दुसरा पक्ष ठेवायचा नाही. सगळेच काही गुलाबोसारखे घाबरणारे नसतात, काही संजय राऊतांसारखे असतात. अनिल देशमुखांचेही तेच. यांच्याकडे जे भ्रष्टाचाऱाच्या आरोपात तिकडे गेले, गोमुत्राने अंघोळ केली आणि धुतले गेले, असा आरोप ठाकरे यांनी केला.
महिलेची तक्रार घेतली जात नाही, उलट तिच्यावर गुन्हे दाखल केले जातायत. ठाण्यातील आमची बहीण तिला मारहाण करण्यात आली. ती मुलाबाळासाठी उपचार घेत होती. तिने व्हिडिओ काढून माफीही मागितली, तरी तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. या रोशनी शिंदेला उपचार घेत असताना पोलीस बाहेर वाटच पाहत उभे होते, ती कधी बाहेर येते आणि तिला कधी तुरुंगात टाकतो. तिच्या मारहाणीवर आजवर गुन्हा दाखल झालेला नाहीय. उलट तिच्यावरच गुन्हा दाखल झालेत, असा आरोप ठाकरे यांनी केला.