खेड: काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही चुना लगाव आयोग असे म्हटले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आजपर्यंत जे जे शक्य होईल ते त्यांना दिलं. तरीदेखील आज ते सगळे खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरीदेखील तुम्ही आज माझ्यासोबत आला आहात. आज मी तुम्हाला मागायला आलोय. तुमचे आशीर्वाद अन् साथ पाहिजे. जे भुरटे, चोर, गद्दार, तोतया आहेत, ते शिवसेना नाव चोरू शकता, पण शिवेसेना नाही चोरू शकत. धनुष्यबाण चोरला असाल, पण तो तुम्हाला पेलवणार नाही. जिथे रावण उताणा पडला, तिथे हे मिंध्ये काय उभे राहणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
'भाजपला गल्लीतला कुत्राही विचारत नव्हता, शिवसेना त्यांच्या मागे उभी राहिली'- उद्धव ठाकरे
ते पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला यावं. हा चुना लगाव आयोग आहे. सत्येचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त राहायच्या लायकीचे नाहीत. ज्या तत्वावर त्यांनी शिवसेना त्यांची सांगितली, ते तत्वचं मुळात खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्ताच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केलीये. जे शिवसेना तोडण्याचा, संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना लक्षात येत नाहीये की, तुम्ही शिवसेना नाही, तर मराठी माणसं हिंदुत्वावर घाव घालतत आहात,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.