मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकाराला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहे. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे परंपरागत वारसा यशस्वीपणे चालवू शकतात, मात्र ते मुख्यमंत्री होण्यासाठी जन्मालाच आलेले नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.
पाटील यावेळी म्हणाले की, ठाकरे सरकार आमच्या आंदोलनाला 100 दिवसातच घाबरले आणि दीड लाखाची कर्जमाफी 2 लाख करून दिली. त्यामुळे काही तरी नवीन देण्याची मानसिकता नसलेलं हे सरकार असल्याचं त्यांनी आरोप केला.
तर याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सभागृहात प्रमुखांनी प्रश्न-उत्तरला आणि लक्षवेधीला उपस्थित असणे गरजेचे असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सभागृहात धाडसाने बसायला हवे. मात्र असे होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जन्म मुख्यमंत्री होण्यासाठी झालाच नाही. तसेच नेते होण्यासाठी सुद्धा झालेला नाही, मात्र परंपरागत वारसा ते यशस्वीपणे चालवत असल्याचा टोला पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगवाला.
उद्धव ठाकरे यांना हेक्टर आणि एकरमधील फरक कळत नाही. त्यामुळे सरकारचे 100 दिवस गेले असून, पुढील 200 दिवस सुद्धा अशीच जातील. तर स्वार्थासाठी एकत्र आलेल्या माणसांचे स्वार्थ टक्कर देत नाहीत तोपर्यंत ते एकत्र असतात. तसेच स्वार्थासाठी एकत्र आलेल्या लोकांनी तत्वज्ञान सोडायचं ठरवलेलं असतं. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तत्वज्ञान सोडण्याची तयारी दर्शवली असून, हे सावरकरांच्या मुद्यावरून स्पष्ट झाले असल्याचा आरोप सुद्धा यावेळी पाटील यांनी केला.