Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणानं वेग पकडलाय. लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी १९ एप्रिल रोजी पार पडलं. देशात सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही लढाईत उतरतो, सर्वेक्षण करत नाही. जर सर्वेक्षणात तुमचा पराभव होणार आहे, असं समजलंतर तुम्ही लढाई सोडाल का? असं उद्धव ठाकरे म्हणाले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन अन् दिल्लीला जाईन असं फडणवीस म्हणाल्याचा गौप्यस्फोटही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. "मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शिवसेना-भाजपचा अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होईल, यावर अमित शाह यांच्यासोबत एकमत झालेलं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन आणि नंतर दिल्लीला जाऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मला आज भाजपचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?," असा सवालही त्यांनी यावेळी केला.
"भाजप एक व्हॅक्युम क्लिनर"
"काही समस्या असू शकतात. परंतु लोक दुसरीकडे जात असलेल्या त्या गद्दांनाही नाराज आहेत. ते ईडीचा वापर करत आहे, दबाव टाकत आहेत. यांच्यात एक म्हण आहे पन्नास खोके, एकमद ओके," असं एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले.
"भाजप आता एक व्हॅक्युम क्लिनर झालाय. तो भ्रष्ट लोकांना आपल्यात घेतो आणि क्लिन चिट देतो. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, अजित पवार. पक्ष फोडा, घर तोडा कुटुंबांना संपवा, छापे टाका ही त्यांनी रणनिती आहे. त्यांची गॅरंटी पोकळ आहे. नोटबंदीनंतर मोदींनी मला १०० दिवस द्या म्हटलेलं. एप्रिल २०२४ मध्ये २७०० पेक्षा जास्त झाले, काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं त्यांनी म्हटलेलं. पण काय झालं, केवळ खर्च दुप्पट झाला," असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला.