मी मुद्दामहून तुम्हाला रस्त्यावर भेटायला आलेलो आहे. कारण यापुढची लढाई ही रस्त्यावर लढायची आहे. धनुष्यबाण कोणी चोरला ते तुम्हाला माहिती आहे. चोर बाजाराचा मालक कोण ते देखील माहितीये. या चोरांना आणि त्यांच्या मालकाला गाडल्याशिवाय शांत रहायचे नाही. धनुष्यबाण चोरला त्याला माहिती नाहीय मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलेला आहे. त्यांनी आजपर्यंत मध चाखला पण त्यांना अजून डंख बसलेला नाहीय. आता डंख मारायची वेळ आलीय, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
उद्धव ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे ओपन जीप म्हणजेच सनरुफ उघडून शिवसैनिकांना संबोधित केले. माझ्या हातामध्ये काही नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. शिवसैनिकाचा राग पाहू नका, तरुण रक्त खवळलेले आहे. मी पुढचे आदेश दिले जाईन. काल ज्याच्या हातात धनुष्यबाण होता, त्याचा चेहरा मी चोर आहे असा होता, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
मी तुमच्या सोबत पहिल्यापासून होतो. पण आता खांद्याला खांदा देऊन राजकारणात लढुया. कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले. तुम्ही सगळे चिडलेले आहात. असा कोणताही पक्ष नसेल की ज्याच्यावर ७५ वर्षांत हा आघात झाला नसेल. पंतप्रधान आणि भाजपाला असे वाटत असेल की त्यांच्या गुलाम बनलेल्या संस्था अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपविता येतील परंतू शिवसेना संपविणे शक्य नाही. निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली आहे, कदाचित ते निवृत्तीनंतर राज्यपाल होऊ शकतील. असे सगळे गुलाम अवती भोवती ठेवलेले आहेत. त्यांना मी आव्हान देतोय शिवसेना कोणाची ही तुमच्या मालकांनी नाही तर महाराष्ट्राच्या मालकाने ठरविण्याची वेळ आली आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
Eknath Shinde Shivsena: तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता
यांना ठाकरे नाव हवेय, बाळासाहेबांचा चेहरा हवाय पण शिवसेनेचे कुटुंब नकोय. एक वेळ होती जनता मोदींचे मुखवटे घालून येते होते, आता मोदींनी महाराष्ट्रात बाळासाहेबांचा मुखवटा घालून यावे लागते. ज्या पद्धतीने शिवसेनेचे नाव चोरांना दिले गेले, कपट कारस्थाने केली. आपला पवित्र धनुष्यबाण चोरांना दिला गेला, कदाचित मशाल ही निशानी पण काढून घेऊ शकतील. मी आव्हान देतो तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन समोर उभा राहतो, लढाई आता सुरु झालीय. धनुष्यबाण उचलायला मर्द लागतो. रावणाने देखील उचलण्याचा प्रयत्न केलेला पण उताणा पडला. मी खचलेलो नाही खचनार नाही. तुमच्या ताकदीवर उभा आहे. तुमच्या ताकदीवर चोरांना आणि त्यांच्या मालकांना गाडून भगवा उभा करू. उद्या मी फेसबुक लाईव्ह करेन आणि निवडणूक आयोगाला काय काय कसे कसे दिले ते सांगेन, असे ठाकरे म्हणाले.