मुंबई - शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद शनिवारपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी सय्यद यांनी ठाकरे गटातील निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला. मातोश्रीवरील खोक्यामागचे सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत असा आरोप सय्यद यांनी केला. त्यावर आता शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली असून पहिला डाव भूताचा म्हणून सोडून द्या अशा शब्दात दीपाली सय्यद यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया ऐकून हसायला येते. शिवतीर्थावरील माझे भाषण झाल्यानंतर आपुलकीने दीपाली सय्यद यांनी माझं अभिनंदन केले. कौतुक केले. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना विचारलेले प्रश्न योग्य होते असं त्या म्हणाल्या होत्या. कदाचित ४-५ दिवसांत दीपाली सय्यद यांची भूमिका बदललेली असू शकते. गुवाहाटीला आमदार गेल्यानंतर त्यांच्यावर अगदी कडाडून आगपाखड टीका करत होत्या. जर काही कारणं घडली असतील, नवीन वाट चोखाळायची असेल. करिअर घडवण्यासाठी अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच प्रत्येकाला करिअर करायचं आहे. कुणासोबत काय वक्तव्य करणं तर बऱ्याचदा माणसं आरशासमोर उभं राहून बोलत असतात. दीपाली सय्यद या त्यातल्या असून पहिला डाव भूताचा म्हणून सोडून दिले पाहिजे. प्रत्येकाने टीका करताना आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. प्रवेश होण्याआधी त्या बोलत आहेत. जर उद्या प्रवेश झाला नाही तर त्या शब्दांवरून पलटीही मारू शकतात असा टोला सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांना लगावला आहे.
काय म्हणाल्या दीपाली सय्यद?मुंबई महानगरपालिकेतील खोके येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना वाटत आहे. निलम गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा सगळ्या महत्त्वाचा दुवा आहे, सूत्रधार आहेत त्या रश्मी वहिनी आहेत,” असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला. वाद हा मोठ्या पातळीवर होतो, मुंबई पालिका जेव्हा आपल्याकडे कशी येईल, सातत्यानं खोके खोके म्हटलं जातं खोके कोणाकडे आहेत, मुख्य सूत्रधार कोण आहे हे कळलं पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टी पोहोचल्या जातात हे कळलं पाहिजे असं सय्यद यांनी म्हटलं.