"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 04:10 PM2024-08-16T16:10:33+5:302024-08-16T16:11:30+5:30

उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नाही म्हणून कार्यकर्ते मविआवर नाराज; पत्र व्हायरल

Uddhav Thackeray party workers letter goes viral, doubts over MVA role, upset over not making Thackeray the face of CM | "त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..."

"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..."

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे आणावा अशी आग्रही मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यातही काँग्रेसकडे चेहरा देण्याबाबत भूमिका मांडली. मात्र मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ठाकरेंच्या मागणीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यात आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मिलिंद नार्वेकरांना लिहिलेलं पत्र व्हायरल होत आहे. त्यात कार्यकर्ते मविआवर नाराज असल्याचं दिसून येते. 

वाचा कार्यकर्त्यांचं पत्र जसंच्या तसं...

मिलिंद भाई, 

जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार महाविकास आघाडी घोषित करत असेल तरच उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारांवर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील. त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळेल. महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही.

लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस-राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील. मुख्यमंत्रिपदाची ऑफर न देता महाविकास आघाडी प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. त्यातून त्यांचे वेगळे राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपणदेखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तीच रणनीती ठेवावी असं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या आजच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा यावर मागणी केली. आपल्यात काड्या घालणारी लोक युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो...इथं शरद पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. कारण मुळात मी माझ्यासाठी लढत नाही. जेव्हा मी मुख्यमंत्रिपद सोडलं, त्यानंतरही मी जो लढतोय तो स्वत:च्या स्वार्थासाठी लढत नाही. मी महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि महाराष्ट्राला झुकवण्याची हिंमत कोणातही नाही. महाराष्ट्राला झुकवण्याची जो कोणी हिंमत करतो, त्याला आम्ही गाडून टाकतो, या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. 

Web Title: Uddhav Thackeray party workers letter goes viral, doubts over MVA role, upset over not making Thackeray the face of CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.