Uddhav Thackeray News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला चितपट केल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय योजना असेल, याबाबत काही मते मांडली आहेत. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोलही केला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समावेश करणार का, याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडीने वेगळा मार्ग निवडला. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटाशी आघाडी केली होती. मात्र, त्याचेही पुढे काही झाले नसल्याचे चित्र होते. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला काही कमाल करता आली नाही. यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
काही लोक आमच्यासोबत होते. त्यांना घेऊन पुढे जाऊ. कुणी जर आमच्यासोबत येत असतील. कोणतीही अट आणि ओढताण न करता येत असतील तर त्यांनी यावे. तुम्ही जे नाव घेतले. मी त्यावर बोलत नाही. मी जनरल बोलतो, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिले होते. कसेबसे त्यांचे पंतप्रधानपद वाचले. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
दरम्यान, नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचे चित्र अधिक चांगले राहील, असा उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.