ठाणे: पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले द्वंद्व आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जिंकणे दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेचे झाले आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी आला. याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप ऐकवली. या क्लीपच्या सतत्येविषयी अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लीपमध्ये मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा पक्षासाठी अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.या क्लीपमध्ये देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना देत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकदीने आणि खंबीरपणे उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं.. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या क्लीपमध्ये म्हटले आहे. मात्र, भाजपाने या ऑडिओ क्लीपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा केला आहे. या ऑडिओ क्लीपची दखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी उद्धव यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणे हे त्यांना शोभणारे नाही. हे त्यांच्या पदाला काळीमा फासण्यासारखे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरून भाजपा शिवसेनेविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.
उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 4:28 AM