Uddhav Thackeray Nashik News: रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. या सोहळ्यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केलेल्या एका विधानाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एखादे परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली. लोकांना कदाचित माहिती नसेल की, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. मला राज्य करायचे नाही, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आले. पण ज्येष्ठ मंत्र्यांनी महाराजांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले. समर्थ रामदास स्वामी यांचीही यावेळी आठवण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गौरवोद्गार काढताना समर्थ रामदास स्वामी म्हणाले होते की, निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी. आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटले होते. नाशिकमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी यावरून टीका केली.
मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही
जसे संत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक होते, तसेच संजय राऊत यांनी सामनाचे श्लोक सांगितले. श्रीरामाचा अनुयायी म्हणून माझा उल्लेख केला, त्याबद्दल मी आभारी आहे. प्रभू रामचंद्र यांच्याकडून संयम, एकवचनी, एकपत्नी हे गुण घेतले. आता रावणाचे मुखवटे फाडायचे आहेत. राम मंदिर सोहळ्यात कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. अजिबात नाही, त्रिवार नाही, शिवरायांशी तुलना कदापि शक्य नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज राम मंदिर उभे राहिले नसते. नरेंद्र मोदी इतक्या वर्षात अयोध्येला गेले नव्हते, जगभर फिरले, लक्षद्वीपला गेले, पण मणिपूरला गेले नाहीत, अयोध्येत गेले नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला.
दरम्यान, आपला इतिहास आहे, जो महाराष्ट्रावर आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. मग तो अफझलखान असो किंवा औरंगजेब. प्रभू रामचंद्र ही कोणा एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. नाहीतर आम्हालाही भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. जय श्रीराम ऐवजी भाजपमुक्त जय श्रीराम म्हणावे लागेल. राम की बात झाली, काम की बात करा, काँग्रेस सोडा, गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केले, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.