नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या सेनेच्या तृप्ती सावंतांची बंडखोरी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 12:27 PM2019-10-08T12:27:37+5:302019-10-08T12:28:01+5:30
उद्धव यांच्यासमोर आपली बाजू व्यवस्थीत मांडण्यासाठी कमी वेळ मिळाला. अधिक वेळ मिळाला असता तर आपण आपली बाजू योग्यरित्या मांडली असती. कदाचित उमेदवारी मागे घेतली असती, असंही सावंत म्हणाल्या.
मुंबई - वांद्रे पूर्व मतदार संघातील पोट निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव करणाऱ्या शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. सावंत यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना उमेदवार महाडेश्वर यांची अडचण होणार आहे. खुद्ध उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतरही सावंत बंडखोरीवर कायम आहे.
वांद्रे पूर्व मतदार संघाचे आमदार वाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांचे आव्हान होते. सावंत यांनी जोरदार मुसंडी मारत नारायण राणे यांना धुळ चारली होती. त्यामुळे वांद्रे पूर्वमधून पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना खात्री होती. मात्र त्यांना डावलण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर विश्वनात महाडेश्वर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. उमेदवारी नाकरल्याने सावंत नाराज झाल्या. एवढच काय तर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्याला यश आले नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दाखवली नाही.
...तर उमेदवारी मागे घेतली असती
उद्धव ठाकरे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात भेट झाल्याची माहिती तृप्ती सावंत यांनी दिली. मात्र आपल्याला केवळ पाचच मिनिटे भेटल्याचे त्या म्हणाल्या. उद्धव यांच्यासमोर आपली बाजू व्यवस्थीत मांडण्यासाठी कमी वेळ मिळाला. अधिक वेळ मिळाला असता तर आपण आपली बाजू योग्यरित्या मांडली असती. कदाचित उमेदवारी मागे घेतली असती, असंही सावंत म्हणाल्या.