मुंबई : शिवसैनिकांनी, शिवसेनाप्रमुखांनी अनेकांना मोठे केले. ज्यांना मोठे केले तेच विसरले, अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासह विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याची घोषणा जड अंत:करणाने बुधवारी रात्री केली.सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. मी आलोच अनपेक्षितपणे. जातो पण तसाच आहे. मी पुन्हा येईन, म्हणालो नव्हतो, असे सांगतानाच उद्धव यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर आगपाखड केली. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तरी मला लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही.शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही. उद्या हे येणार म्हणून मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसैनिकांना नोटीसा आल्या आहेत. केंद्रीय पथके आली, लष्करही बोलावले जाईल. एकाही शिवसैनिकाने बंडखोर आमदारांच्या मध्ये येऊ नये. लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी असतात. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. त्याचा आनंद त्यांना साजरा करायचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना अडवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
नामकरणामुळे आयुष्य सार्थकी लागलेसंभाजीनगर नामकरण आणि उस्मानाबादचे धाराशिव केले. आयुष्य सार्थकी लागले. पण, हा निर्णय घेताना मी, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल परब असे चारच शिवसेनेचे मुख्यमंत्री होतो. बाकीचे कुठे होते तुम्हाला माहितच आहे. आता हिंदुत्वासाठी इतके केल्यावरही आणखी काय हवे आहे, असा प्रश्नही उद्धव यांनी केला.
शिवसेना कोणी हिरावून घेऊ शकत नाहीशिवसेना आपलीच आहे. ती आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आता नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.दृष्ट लागलीएखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागते. जे जाणार, जाणार म्हणत होते ते सोबत राहिले, असे सांगतानाच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.
शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात - राऊत- शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेवू, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये राऊत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. - दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री अत्यंत डौलाने पदावरून पायउतार झाले, असे राऊत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी "ही अग्निपरीक्षेची वेळ आहे, हेही दिवस जातील" असे म्हटले.