Thackeray Group Vs Shiv Sena Shinde Group: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. एकीकडे पक्षातील दिग्गज नेते, आमदार, खासदार, नगरसेवक साथ सोडताना दिसत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी विविध विभागातील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले असून, पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. यातच कल्याण-डोंबिवलीच्या जागेसाठी खास रणनीति तयार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट निवडणुकांसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत घेरण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीची जागा आपल्याला जिंकायची आहे
श्रीकांत शिंदेंच्या विरोधात प्रबळ उमेदवार देणार असल्याचे ठाकरे गटाने ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोरिवली मागाठाणे, कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. कल्याण-डोंबिवलीची जागा आपल्याला जिंकायची आहे.उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर निर्धारच केल्याचे सांगितले जात आहे.
मतदारसंघात फिरत राहा, उद्धव ठाकरेंच्या सूचना
विधानसभा संपर्कप्रमुख यांनी कामाला लागावे. बूथ प्रमुख आहेत त्यांना सक्रिय करा, त्यांच्याकडून कामे करून घ्या. मतदारसंघात फिरत राहा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच मतदार यादीत ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून अडचणी जाणून घ्या. ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे, त्यांच्याशी संपर्क करून अडचणी सोडवा. केव्हाही निवडणुका लागू शकतात आपण तयार असायला हवे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.