मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. निष्ठा यात्रेनंतर आता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा युवसैनिक आणि शिवसैनिक यांची मोट बांधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करताना दिसत आहे. दुसरीकडे मात्र शिंदे गटाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. यातच पक्षातील अभूतपूर्व बंडाळीनंतर आता पक्ष वाचवण्याचे सर्वांत मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली.
निवडणूक आयोगापुढे आता एक नवीन खटला उभा राहतोय तो म्हणजे धनुष्यबाण कोणाचा तसेच शिवसेना खरी की खोटी याचे पुरावे द्यावे लागतायत, यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. चोरी-मारी सगळीकडेच चालते असं माझं अजिबात मत नाही. मी जे म्हटलं ना की ‘सत्यमेव जयते’… नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि मग एकाची दोन वाक्यं करावी लागतील. एकतर ‘असत्यमेव जयते’ आणि दुसरं वाक्य ‘सत्तामेव जयते.’ त्यामुळे सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत. तसेच लोकं निवडणुकांची वाट पाहात आहेत. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोकं म्हणतात निवडणुक येऊ द्या.. यांनाच पुरून टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. जनताच यांना पुरून टाकेल राजकारणातून, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं
बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही इतके ‘रिलॅक्स’ कसे?
दरम्यान, बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही तुम्ही इतके ‘रिलॅक्स’ दिसताय, याचे रहस्य काय असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावर हसतमुखपणे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे रहस्य फार गुंतागुंतीचे नाही. तुम्ही जाणता, माझी माँ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेले हे रसायन आहे. माँ म्हटल्यानंतर शांत, सौम्य, संयम आणि साहजिकच आहे, बाळासाहेब म्हटले तर वर्णन करण्याची आवश्यकताच नाही. बाळासाहेब काय होते हे महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश जाणतो. थोडेफार ते रसायन आलेय माझ्यात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.