पुणे: सहकार आणि राजकारण वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळे जागा जास्त आहे म्हणून आमची पिकं सगळीकडे येणार असे म्हणून नयेत. तर कमीत- कमी आमदार असताना सुद्धा सरकार कसे आणता येते हे मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिकवले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र आम्ही कमी आमदार असताना सुद्धा सरकार स्थापन केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याच वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा निशाणा साधला.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, कार्यक्रमाला आलेल्या संस्थेचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे आहे. ते तुम्हाला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन द्यायला शिकवतात. त्याचप्रमाणे राजकारणात पवारांनी नवीन चमत्कार केला. कमीत कमी आमदारात त्यांनी राज्यात सरकार स्थापन करून चमत्कार केला. त्यामुळे असं म्हणू नये जागा जास्त आहे त्यामुळे आमची पिकं सगळीकडे येणार. कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करु शकतो, आणि ते करुनही दाखवले. असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.
तर राज्यात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन लाख कर्जमुक्ती होणार असून, दोन लाखांवरील लोकांना दिलासा देणारा हा शब्द आहे. तसेच आम्ही नियमित कर्ज भरणाऱ्याला सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभे राहण्याचे काम करणार असल्याचा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.