Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil at Dasara Melava Shivaji Park: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आज दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. दरवर्षी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष असते. त्यानुसार आजही या मेळाव्याला लोकांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे भाजपावर आणि शिंदे गटावर काय टीका करणार याबाबतही चर्चा सुरू होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले. इतकेच नव्हे तर त्यांना धन्यवाद देण्याचे कारणही सांगितले.
"आज महाराष्ट्रात आणि देशात खूप प्रश्न आहेत. पण भाषणाच्या सुरूवातीला मी जरांगे पाटलांना धन्यवाद देतो. अत्यंत समजूतदारपणे त्यांनी आपलं आंदोलन सुरू ठेवलं आहे. त्यात आज त्यांनी एक चांगली गोष्ट करून धनगरांना साद घातली आहे. जालना येथे शांततेत बसलेल्या आंदोलक मराठा बांधवांवर सरकारने पाशवी लाठीमार केला. मी मनोज जरांगे पाटलांना विशेष धन्यवाद यासाठी देतोय. कारण भाजपा जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपापसात झुंजवण्याचा कारस्थान करतंय. ते आपण सारे मिळून मोडून तोडून टाकायचं आहे. सगळे मराठी लोक एका मातीची लेकरं आहोत. याबाबत जरांगे पाटलांनी सावध राहायला हवं. ते आंदोलन नीट चालवत आहेत. त्यामुळेच मला त्यांचं अभिनंदन करावं वाटतं," अशा शब्दांत त्यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले.