ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - रावणास पाकड्यांचे रूप देऊन त्यास अग्नी देण्याचे प्रकार सुरूच आहेत. म्हणजे दसतोंडी रावण पुराणात असला तरी शंभर प्रकारचे रावण वर्षानुवर्षे जाळले जात आहेत व ‘अच्छे दिन’च्या रणभेदी फुंकल्या तरी ‘रावणां’चा आकडा काही कमी होताना दिसत नाही. गरिबी हटावच्या घोषणेपासून आजच्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेपर्यंत विचार केला तर देशात बदलले काय, याचे उत्तर लालकिल्ल्यावरून देणे जमले नाही तरी राज्यकर्त्यांच्या कृतीत ते दिसावे ही लोकांची अपेक्षा आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयच्या माध्यमातून बोलले आहेत.
नाही म्हणायला ‘उरी’च्या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आतापर्यंत हे पाकडे कश्मीरात घुसून आमच्या जवानांचे रक्त सांडत होते. बलिदाने होत होती. आता प्रथमच मोदी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक’ नावाचा हल्ला करून पन्नासेक अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. हे पाऊल धाडसाचे आहे व त्यामुळे आम्ही सरकारला धन्यवादच देत आहोत. असेच सर्जिकल स्ट्राइक महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारीचा राक्षस गाडण्यासाठीही व्हावेत अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
सैनिकांचे रक्त सांडतच असते. देशासाठी बलिदाने देण्याची आपली परंपरा आहे; पण सांडलेल्या रक्तावर संशय घेण्याचे मूर्ख प्रकार काँग्रेस पक्षातील टीनपाट करतात. म्हणे ‘‘सर्जिकल स्ट्राइक झालाच नाही! सरकार गंडवागंडवी करीत आहे. हल्ला झालाच आहे तर मग व्हिडिओ चित्रफीत दाखवा!’’ अरे गधड्या, तुझ्या नसात खरोखरच भारतमातेचे रक्त आहे की इस्लामाबादच्या गटाराचे पाणी वाहते आहे? मुळात अशी शंका घेणे ही जवानांच्या हौतात्म्याची चेष्टा आहे. जवानांच्या हातात बंदुका असतात. कॅमेरे घेऊन ते नवाज शरीफच्या पोरीच्या लग्नाचे व्हिडिओ चित्रण करीत नव्हते. हे या मूर्खांना कोण सांगणार? अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली आहे.
कश्मीरच्या हिंसेवर बोलावे तरी किती? पंतप्रधान मोदी सध्या हिंदुस्थानातच विसावले आहेत ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. कुठल्या राज्यात पाणी पेटले आहे तर कुठल्या राज्यात जात पेटली आहे. मराठा समाजाचा जो भडका महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उतरला आहे त्या अग्निप्रलयाचा लोळ राज्यकर्त्यांना जाळून मारेल असे वातावरण आहे. प्रश्न फक्त आरक्षणाचा नाही. सामाजिक सुरक्षेचा आणि समतेचा आहे. माणुसकीचा धर्म पाळला जात नाही तेव्हा ‘धर्म’ बाजूला ठेवून ‘जात’ म्हणून ‘लोक’ रस्त्यावर उतरतात व नेते त्या गर्दीचे शेपूट बनून फरफटत जातात असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
दसर्याचे सीमोल्लंघन होत आहे. विचारांचे सोने समजून आपट्याची पाने लुटण्याचे सोपस्कार होतच राहतील; पण शेवटी खरे सोने गुंजभरही विकत घेण्याची ताकद सामान्यजनांत राहिलेली नाही. जगण्याच्या बाबतीत जीवनात रोजच आपटावे लागत असल्याने आपट्याची पाने वाटून तरी काय करायचे, हा प्रश्न जनतेला भेडसावत आहे. संध्याकाळी काळोख झाल्यावर ‘रावण’ दहनाचे सोहळे नित्यनेमाने पार पडतील. पुन्हा नक्की कोणत्या रावणांचे दहन करायचे याचा कुणास काही पत्ता नाही असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.