मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता १ जून रोजी सातवा आणि अखेरचा टप्पा बाकी आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागेल. मात्र तत्पूर्वी निकालानंतरची रणनीती आखण्यासाठी दिल्लीत विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी येणार नाही. त्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरे, संजय राऊतही या बैठकीला दांडी मारणार असल्याचं पुढे आलं आहे.
काँग्रेसच्या पुढाकारानं आयोजित इंडिया आघाडीच्या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे दोघेही गैरहजर असतील. कारण हे दोन्ही नेते सध्या परदेशात आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हे नेते कुटुंबासह परदेशात फिरायला गेलेत. २ जूनला ते परतणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीत ते अनुपस्थित राहतील असं बोललं जातं. मात्र ठाकरे गटाचे प्रतिनिधी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहतील.
तर शरद पवार हे सध्या काश्मीरमध्ये असून तिथून ते इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीत जातील. निवडणुकीच्या निकालापूर्वीची ही महत्त्वाची बैठक आहे. १ जूनला मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे काँग्रेसनं इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांना निमंत्रित केले आहे. मात्र उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याऐवजी ठाकरे गटाचे इतर नेते किंवा खासदार या बैठकीला उपस्थित राहतील अशीही माहिती आहे.
दरम्यान, १ जून रोजी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निकालावर चर्चा केली जाईल. निवडणुकीतील प्रचाराचा आढावा घेतला जाईल. इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर पुढची रणनीती कशी असेल, पंतप्रधानपद कोणाला मिळेल, सत्तेतला वाटा कसा द्यायचा याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं बोललं जातं. या बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणं अपेक्षित होतं. परंतु नियोजित कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात असल्याने ते हजर राहणार नाहीत ही आत्ताची माहिती आहे.