Sanjay Raut Uddhav Thackeray vs BJP: भारतात सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती अयोध्येतील राम मंदिरात प्रभूरामाच्या प्राणप्रतिष्ठेची. पंतप्रधान मोदी आणि इतर महत्त्वाच्या मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमंत्रणावरूनही अनेक नाराजीनाट्य रंगली. पण या सर्व गोंधळात बाबरी नेमकी कोणी पाडली, त्यावेळी तेथे नेमके कोण लोक होते? अशा चर्चाही अजून सुरू आहेत. भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून बाबरी पाडण्यात त्यांच्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. त्यातच संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपावर टीका केली. त्याला भाजपाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले.
संजय राऊतांचा दावा काय?
संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी एका मुलाखतीत बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावर बोलत आहेत. या व्हिडीओत अटलजींच्या म्हणण्यानुसार, अयोध्येत त्यावेळी उपस्थित असलेल्या भाजपाच्या नेतेमंडळींना कोलाहल नको होता, त्यामुळे त्या नेत्यांनी बाबरी मशीद पाडू नये यासाठी प्रयत्न केला होता. सध्याच्या भाजपा नेत्यांकडून सातत्याने दावा केला जातो की, बाबरी पाडण्यात भाजपाचेही लोक होते. पण अटलजींच्या याच वाक्यावरून संजय राऊतांनी आताच्या भाजपा नेत्यांना स्मरणगोळीची आवश्यकता आहे असा टोला लगावला. "महाराष्ट्रातील.. श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे... तथाकथित राम भक्तांसाठी.. ही 'स्मरण गोळी' Memory tablets.. उगाळून घ्या.. आणखी देखील जालीम डोस आहेत.. योग्य वेळी देऊच.." असे ते ट्विट होते.
भाजपाने घेतला संजय राऊतांचा समाचार
भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या मुद्द्यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोघांना लक्ष्य केलं. "अहो सर्वज्ञानी …. संजय राऊत, आमच्यासाठी स्मरणगोळीची उठाठेव करण्यापेक्षा तुम्ही स्वत:च्या ‘लाँग टर्म मेमरी लॅास’वर उपचार घ्या. राम मंदिर आंदोलनातलं स्वर्गीय बाळासाहेबांचं योगदान भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी कधीच नाकारलेलं नाही. आम्ही सवाल उद्धवजी आणि तुमच्या योगदानाबद्दल उपस्थित करतो कारण तेव्हा उद्धवजी जंगलात प्राण्यांच्या संगतीत रमले होते आणि तुम्ही राम जन्मभूमी आंदोलनावर विखारी आसूड ओढत होतात.. प्रदीर्घ काळ चाललेला राम मंदिराचा लढा रामभक्तांच्या सहकार्यातून नेटाने पूर्णत्वाला नेला तो भाजपनेच… त्यामुळे आता उगाच कोल्हेकुई करून तुमच्या हाती काही लागणार नाही," असे खोचक उत्तर चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले.