मुंबई-
शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ झालेली असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. "मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे", अशी सुरुवात करत उद्धव ठाकरेंनी आता थेट मैदानात उतरुन बंडखोरांना इशारा दिला आहे. "महत्वाकांक्षा असावी पण अशी नसावी की ज्यानं दिलं त्यालाच खावं. तुम्हाला आमदार घेऊन जायचे आहेत घेऊन जा...आणखी कुणाला जायचं असेल त्यांनीही जा. जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना भवनावर आज शिवसेना जिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. उद्धव ठाकरेंनी यावेळी भावनिक आवाहन तर केलंच पण अखेरीस रोखठोक भूमिका घेतली आहे. "ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंड नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. सेनेची मूळं आज माझ्यासोबत आहेत", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंमत माझ्या रक्तात हे मोदींनाही सांगितलंय"मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं हिंमत माझ्या रक्तात आहे. पहिलं ऑपरेशन ठिक होतं. पण ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या शरीराच्या काही भागांच्या हालचाली बंद पडल्या आहेत असं जाणवू लागलं. त्यामुळे दुसरं ऑपरेशन करावं लागलं. याकाळातही विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच महिने मी कुणाला भेटू शकलो नाही. त्याचा असा फायदा घेतला जात आहे. मी त्यादिवशी सगळं मनातलं बोललो आजही बोलतो. मला शब्द देऊन गेले. तिकीट कापलं तरी एकनिष्ठ राहिन म्हणणारे तिकडे गेले", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंना बडवे म्हणणाऱ्यांना चपराक "आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का. आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का. या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार", असं रोखठोक विधान करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.