मुंबई - रिफायनरी प्रकल्पाला नाणारऐवजी बारसू येथील जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला केंद्राला पत्र लिहून सुचवली होती. ते पत्र लिहिण्याआधी स्थानिकांचा विचार करायला हवा होता. त्यावेळी ग्रामस्थांना विचारून पत्र देणे गरजेचे होते. पण त्या पत्रानुसार आता सर्वेक्षण सुरू झाले तर आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आपण आहोत हे दाखवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत असा आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
बारसू पेटलं! स्थानिकांचा उद्रेक, पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
मंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रशासनाचे अधिकारी लोकांशी चर्चा करायला तयार आहेत. चर्चा सुरूही आहेत. गवताला आंदोलनकर्त्यांनी आग लावली तो विझवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. अश्रुधुराचा वापर केला नाही. प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरू आहे. अद्याप प्रकल्प करायचा की नाही हे ठरलं नाही. कुठेही पोलीस कारवाईचा बडगा करू नये अशा सूचना दिल्या आहेत. काम करणारी माणसेच आहेत. चर्चेला वाव आहे. माती सर्वेक्षण झाल्यानंतरच प्रकल्प तिथे येणार की नाही हे कळेल असं त्यांनी सांगितले.
तसेच माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्यादृष्टीने हे चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, लोकांच्या मनातील सर्व शंका दूर करण्यास सरकार तयार आहे. लोकांना जे आवश्यक आहे ते करायला तयार आहे. माती परिक्षण झाले म्हणजे प्रकल्प होणार असं नाही. अद्याप पुरेसा वेळ आहे लोकांची चर्चा सुरू आहे. आम्हीदेखील तिथे जाऊ शकलो असतो परंतु राजकीय वातावरणामुळे तणाव आणखी बिघडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. लोकांच्या मनातील संशय दूर झाल्याशिवाय सरकार प्रकल्प पुढे रेटून नेणार नाही असंही आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
खासदार विनायक राऊतांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी ताब्यातराजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात होती. मात्र तत्पूर्वी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले बारसूनजीक रानतळे येथे ही कारवाई करण्यात आली. बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध केला आहे. मंगळवारी काम सुरू होताना पहिल्या दिवशी झालेल्या रस्त्यावरील आंदोलनानंतर ग्रामस्थ केवळ ठिय्या करत होते. खासदार राऊत यांनी दिलेल्या भेटीनंतर आता या आंदोलनाने पुन्हा उचल घेतली. त्यानंतर जमावाने सर्वेक्षणस्थळी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली.