महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:38 PM2024-09-12T12:38:09+5:302024-09-12T12:38:44+5:30

MVA Seat Sharing: महायुतीत जागावाटपावरून रुसवे-फुगवे असताना, दोघांची वाटणी आता तिसऱ्या पक्षालाही करायची असल्याने तणाव असताना मविआमध्येही काही कमी रस्सीखेच नसल्याचे दिसून येत आहे.

Uddhav Thackeray- Sharad Pawar-Congress tug-of-war over 163 seats maharashtra vidhan sabha, after the Mahayuti; Revelation of a vijay Wadettivar | महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा

महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा

महायुतीत जागावाटपावरून रुसवे-फुगवे असताना, दोघांची वाटणी आता तिसऱ्या पक्षालाही करायची असल्याने तणाव असताना मविआमध्येही काही कमी रस्सीखेच नसल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीत २८८ जागांपैकी केवळ १२५ जागांवरच एकमत असल्याचे काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच उर्वरित १६३ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगणार असल्याची चिन्हे आहेत. 

लोकसभेला राज्यातील बहुतांश जागा सुटल्या तरी देखील वर्षा गायकवाड यांचा मतदारसंघ आणि सांगलीची जागा काही केल्या शेवटपर्यंत सुटली नव्हती. उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिल्याने सांगलीत मोठा वाद निर्माण झाला होता. मुंबईतील जागा अखेर ठाकरे शिवसेनेने वर्षा गायकवाडांना सोडली होती. बाकी इतर जागांवर किरकोळ रस्सीखेच झाली होती. तशीच रस्सीखेच २८८ मतदारसंघांसाठी होताना दिसणार आहे. 

विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीमध्ये जागावाची बैठक गणपती विसर्जनानंतर होणार आहे. काही जागांवर एकमत आहे, अशा 125 जागांवर कुठलीही अडचण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर अंबादास दानवेंच्या शिवसेना मुस्लिम उमेदवार देणारच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या देशामध्ये लोकशाही आहे, आणि लोकशाही मध्ये हिंदू, मुस्लीम, दलीत असा भेदभाव करता येणार नाही. शिवसेनेने जर मुस्लीम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगं वाटत नाही ते लोकशाही, संविधानाला मानतात असा त्याचा अर्थ होतो, असे वडेट्टीवार म्हणाले. 

अजित पवार, मुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषदेवरूनही वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. काल त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकदाही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहिले नाही. सगळ्यांचे चेहरे पडले होते, तेज नव्हते याचा अर्थ परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासात अधिकाअधिक काय मिळवता येईल यासाठी हे सुरु आहे, असेही ते म्हणाले. 

लोकसभा सचिवालय पक्ष कार्यालय वाटपावर बोलताना शरद पवार गटाला कार्यालय मिळाले नाही यावरून कदाचित जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपकडून सुरु आहे, अशी टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन आणि त्यांच्या ओळखीचा वापर करून राज्यभर शिवसेना शिंदे गट फिरले आणि लोकसभेत पण बाळासाहेबांचा फोटो वापरला. आता शिंदे हे नाव लिहून शिवसेनेची ओळख शिंदे असं जर करत असतील तर शिंदे गटाला या नावाला वलय काय आहे, किमया काय आहे हे विधानसभेत दिसेल, जनता यांना दाखवून देईल, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. 

Web Title: Uddhav Thackeray- Sharad Pawar-Congress tug-of-war over 163 seats maharashtra vidhan sabha, after the Mahayuti; Revelation of a vijay Wadettivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.