चिपळूण - येत्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे घ्यावा आणि तिथून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार सुभाष बने यांनी उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे. या मतदारसंघात पूर्वीपासून शिवसेनेचं वर्चस्व राहिले आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने विनायक राऊतांना मताधिक्य दिलंय त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे असावा आणि तिथून रोहन बने याला उमेदवारी द्यावी अशी मागणी सुभाष बने यांनी ठाकरेंकडे केली आहे.
माजी आमदार सुभाष बने म्हणाले की, चिपळूण मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे, रवींद्र माने, मी, भास्कर जाधव, बापू खेडेकर, सदानंद चव्हाण असे आमदार निवडून गेलेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे ठेवावा. या मतदारसंघातून आपल्याला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे असावा यासाठी मी दावा करतोय असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय या मतदारसंघात उमेदवार म्हणून रोहन बने, सुशिक्षित, उच्चशिक्षित आहे, त्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चांगल्यारितीने सांभाळले. कोविड काळात खूप चांगले काम केले आहे. सर्व तालुक्यात खेडेपाड्यात जाऊन रुग्णांना मदतीचं काम केले आहे. चिपळूणच्या महापूरात रोहन सर्वप्रथम लोकांच्या मदतीला धावून गेला आहे. हा उमेदवार आपल्याकडे असताना शिवसेनेने ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. जागावाटपात या मतदारसंघात वरिष्ठांनी दावा करावा असं माजी आमदार सुभाष बने यांनी म्हटलं आहे.
सध्या मतदारसंघात काय परिस्थिती?
दरम्यान, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ते अजित पवारांच्यासोबत गेलेत. तर याठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत यादव यांनी लढण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशांत यादव हे काँग्रेसचे तालुका प्रमुख होते, त्यांनी जयंत पाटलांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. २०१९ च्या निकालात ही जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यात ठाकरे गटाने केलेल्या या मागणीमुळे हा मतदारसंघ कुणाला सुटणार हे पाहणे गरजेचे आहे.