छत्रपती संभाजीनगर - लोकसभेला महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मुस्लिमांचा वाटा सर्वाधिक होता असं विधान शरद पवारांनी एका कार्यक्रमात केले होते. भाजपाकडूनही उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुस्लीम मतांच्या जीवावर खासदार निवडून आलेत असं सातत्याने म्हटलं जातं. मात्र आता विधानसभा निवडणुकीत मुस्लीम उमेदवारही ठाकरे गट उतरवू शकतो असं बोललं जातं. आम्हाला मुस्लिमांचं वावडं नाही. मेरिटच्या आधारे मुस्लीमालाही उमेदवारी देऊ असं विधान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, येणाऱ्या काळात मुस्लिमांना चांगले प्रतिनिधित्व महाविकास आघाडी देणार आहे. शिवसेनाही मुस्लीम उमेदवार देऊ शकते, शिवसेनेत जातधर्माच्या आधारे उमेदवारी दिली जात नाही तर मेरिटच्या आधारे दिली जाते. मेरिटमध्ये एखादा मुस्लीम बसला तर त्यालाही उमेदवारी दिली जाऊ शकते. शिवसेनेला मुस्लिमांचे वावडं नाही. जातपात धर्म बघून कुणालाही उमेदवारी मिळत नाही. मेरिटमध्ये मुस्लीम बांधव बसला तरी त्याला उमेदवारी मिळेल. बौद्ध बांधव बसला तरी त्याला मिळेल, हिंदू बसला तरी त्याला तिकीट मिळेल. मेरिट आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितले.
फक्त उमेदवारी नको, निवडून आणण्याची जबाबदारी घ्या
तर भाजपाच्या विरोधात जाऊन, केंद्रात मोदी सरकार नको म्हणून लोकसभेला महाविकास आघाडीला मुस्लिमांनी मतदान केले परंतु आता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला कळालंय, तशी परिस्थिती विधानसभेला निर्माण होणार नाही. त्यामुळे पहिल्यापासून त्यांनी ठरवलं आहे, आपल्याला मुस्लीम मते हवी असतील तर काही मुस्लीम उमेदवार द्यावे लागतील. ही आनंदाची गोष्ट आहे. पण फक्त उमेदवारी देऊ नका तर त्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारीही घ्या, चांगला उमेदवार द्या अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते माजी आमदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
दरम्यान, ही लोकशाही आहे, त्यात हिंदू, मुस्लीम आणि दलित असा भेदभाव करता येणार नाही. तुम्हाला मत मागताना, तुम्ही या अजेंड्यावर जाणार तर तुम्ही मत मागण्याचा अधिकारही गमावून बसणार. त्यामुळे शिवसेनेची मुस्लीम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला त्यात काही वावगं वाटत नाही. ते लोकशाहीला आणि संविधानाला मानतात असा त्याचा अर्थ होतो असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
मुस्लिम दुरावत असल्याने उमेदवारीचे लालच
मुस्लिमांची मते कशी घ्यायची याकडे उद्धव ठाकरेंचा कल, त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. फुकटची मते कशी मिळतील याचा प्रयत्न आहे. मोदींविरोधात लाट निर्माण करायची, मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे मिरवायचे ही या लोकांची हिंदुत्वाची भूमिका घातक आहे. हे ना हिंदुंची प्रामाणिक राहिले ना मुस्लिमांशी, त्यामुळे उद्धव ठाकरे मुस्लिमांना कधीच जवळ करणार नाही हे कळाल्यानंतर मुस्लीम जसजसा दुरावत चालला आहे तसं मुस्लिमांना लालच दाखवायला लागलेत असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेंना लगावला.