पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या मित्र पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. पण असे असताना उध्दव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे की नाही यावरून बरीच चर्चा रंगली आहे. परंतु, एकीकडे यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण असावं असे मत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे. तसेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जवळपास १५०-२०० लोकांना निमंत्रण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण कुणाला द्यायचं, नाही द्यायचं याची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे असे सांगत त्यांनी आमंत्रणाचा सस्पेन्स कायम ठेवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गोविंदगिरी महाराज म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असावं तसेच देशाच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यालाया गौरवशाली सोहळ्याचे निमंत्रण दिलं गेलं पाहिजे. पण सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर ही सर्व मंडळी हेलिकॉप्टरने येतील.इतक्या मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर त्या कार्यक्रम स्थळी आली तर त्यांची व्यवस्था करणे शक्य होणार नाही..पण तरीही ज्यांना यायचं असेल त्यांचं स्वागत असेल त्यांनी अवश्य यावे. अयोध्येत उत्सव होत असताना सर्वच जण प्रत्यक्षात तिथे जाऊ शकणार नाहीत..अशा परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्या नागरीकांनी आपल्या घरात, गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पळून उत्सव साजरा करावा.
..............................
अन् मोदी भूमिपूजनाला यायला तयार झाले.. कोरोनाचे संकट तर आहेच..पण काही कामांसाठी प्रत्यक्षात जावं लागते. त्यामुळे बंगालमध्ये चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये मोदी तिथे जाउ शकतात तर इथे यायला काय हरकत आहे असे मी त्यांना सांगितले होते..त्यामुळे मोदी भूमिपूजनाला यायला तयार झाले असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.
अयोध्येतील राममंदिर हा फक्त मंदिर आणि एका वास्तूचा प्रश्न नाही तर स्वाभिमानाचा विषय आहे.कोरोनाच्या या परिस्थितीत देशातील लोकांचे मनोबल वाढले पाहिजे आणि मंदिरा या भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे देशातील लोकांचं मनोबल नक्कीच वाढेल.औषधापेक्षा आत्मविश्वास या मंदिराच्या निर्माण होणार आहे.राष्ट्राचा मनोबल वाढवणारा आहे,हा सर्वात महत्वाचा उपाय आहे असेही मत गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले.