विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात जावे, अशा शुभेच्छा देतानाच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या कायमच शुभेच्छा आहेत, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केले.
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी, सध्या राष्ट्रीय राजरकारणात नेतृत्वाची पोकळी दिसत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय राजकारणात उतरावे, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आज ममता बॅनर्जी आणि आधी चंद्राबाबू नायडू यांनी तसे केलेले आहे. राष्ट्रीय राजकारणात नजीकच्या काळात काही महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात आणि त्यात महाराष्ट्राचे महत्त्व राहावे म्हणून शरद पवार यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरेंचेही राष्ट्रीय राजकारणात राहणे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरेंना आपण पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा देता का, या प्रश्नात राऊत म्हणाले की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना आमच्या कायमच शुभेच्छा आहेत.मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी स्वत: गाडी चालवित असल्याचा आणि उद्धव ठाकरे हे बाजूला बसले असल्याचा फोटो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिष्ट्वट केला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले की, गाड्या पुरविण्याचे काम आम्हीच करतो. कदाचित सरकारची गाडी कशी चाललीय ते पाहताहेत, माझ्या अजित पवारांनाही शुभेच्छा आहेत.
निमंत्रण आल्यास ठाकरेअयोध्येला नक्कीच जातीलअयोध्येतील श्री राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले तर उद्धव ठाकरे नक्कीच जातील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. यावरून अद्याप असे निमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले.