मुंबई : देशातील बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी मुंबईत संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले.
"उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरे असे कधीच नसते. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे माझे मत आहे. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
याशिवाय, संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोलाही लगावला. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, मागील काही दिवसात निधी वाटपावरुन काँग्रेस आमदार नाराज असल्याचे समोर आले होते. याबाबत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "तीन पक्षाचे सरकार असताना निधी वाटपास आमदार आणि खासदारांची नाराजी आहे. पण केंद्राने निधी गोठवल्यामुळे अडचण आहे."
याचबरोबर, शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नाराजीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. यावरुन राज्यातील महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याची चर्चा रंगू लागली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असतेच. संजय जाधव मुंबईत आलेले आहेत, यातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. जी समन्वय समिती आहे ती मंत्रालय कामकाजासाठी आहे. तिन्ही पक्षांना समन्वय समितीची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु गरज पडल्यास पुन्हा विचार करु."
काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधीच सक्षम - संजय राऊत
काँग्रेस हा देशाला माहित असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे. सोनिया गांधी यांचे वय ७० पेक्षा जास्त आहे. इतकी वर्ष त्या नेतृत्त्व करत आहे. प्रियंका गांधी पूर्णवेळ राजकारणात दिसत नाहीत. इतर ज्येष्ठ नेते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावे आणि जमिनीवर काम करावे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
आणखी बातम्या...
घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...