मुंबई : कानडी पोलिसांकडून यळ्ळूर येथील मराठी बांधवांना आणि माताभगिनींना झालेल्या अमानुष मारहाणीबाबत केवळ शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून लोकसभा दणाणून सोडली. राज्यातील आघाडी सरकारचे खासदार मूग गिळून बसले होते. शिवसेनेला या प्रश्नी वणवा पेटवायची अजूनही इच्छा नाही. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आम्ही सोडवणारच, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावात केले. शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई यांच्या ‘२0१४ या सुराज्याकडे’ कार्यअहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. आता राज्यात परिवर्तन होणार असून, महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र होण्यासाठी उद्धव ठाकरे यांची वाटचाल सुरू आहे. ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्वीकारावे अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचे मत या वेळी सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर सुभाष देसाई, महापौर सुनील प्रभू, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना उपनेते विजय कदम, महिला विभाग संघटक साधना माने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सत्ता आल्यावर सीमाप्रश्न सोडवू - उद्धव ठाकरे
By admin | Published: August 04, 2014 3:33 AM