मुंबई- काळ्या पैसा पांढरा करणारा चंदू पटेल सध्या जेलमध्ये आहे त्याच्याबरोबरचे संबंध, व्यवहार उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे, असं थेट आव्हान भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. बाळासाहेबांच्या नावावर एक संपत्ती नव्हती. पण मेहुणा, पीए, उद्धवचं तसं नाहीये, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावावरील कंपन्यांची माहिती उघड करावी, असं म्हणतं किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
पराभवाने बावचळून गेलेल्या शिवसेनेने पुन्हा माफियागिरी सुरू केल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. भांडुपमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला. भांडुपमधील पराभव शिवेसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला म्हणूनच त्यांनी माफियागिरी सुरू केल्याचा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शुक्रवारी शिवसेनेची वाट धरली. या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत यावं यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांना काय आमिष दिलं याची चौकशी व्हावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेनेकडून खरेदी-विक्रीचा महासंघ सुरू झाला आहे, मी जर असं काही केलं तर माझ्यावरही टीका करा, असंही सोमय्या यांनी म्हंटलं.
मुंबई महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार असल्याचं मनसेने आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे महापालिकेतील संख्याबळ वाढविण्यासाठी शिवसेनेला जर मदत हवी होती, तर त्यांनी मनसेकडून मागायला हवी होती, असंही सोमय्या म्हणाले. ज्यावेळी नगरसेवक पाठिंबा देत होते तेव्हा घेतला असता तर आज असं झालं नसतं, असं मत किरीट सोमय्या यांनी मांडलं. मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक हे आधीचे शिवसैनिक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हंटलं होतं. त्यावरही किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. या सहा नगरसेवकांना अचानक ब्रम्हज्ञान मिळालं, त्याचीच आता चौकशी व्हावी आणि त्या चौकशीचा रिपोर्ट जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेनेने मनसेच्या सहा नगरसेवकांना काय आमिष दिलं? याची चौकशी करणं ही निवडणूक आयोग, लाचलूचपत विभाग आणि प्रशानसनाची जबाबदारी असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.