Uddhav Thackeray Shiv Sena: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ८-१० महिन्यात बऱ्याच राजकीय हालचाली घडल्या. सर्वप्रथम विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस राज्यात मोठे बंड झाले. शिवसेनेचे अतिशय विश्वास मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीने बंडखोरी केली. त्यानंतर ३९-४० आमदारांच्या समर्थनाने आणि भाजपाच्या साथीने शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नुकताच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार, शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे साऱ्या गोष्टी ठाकरे गटाच्या मनाविरूद्ध घडत असतानाच आता, त्यांच्याच गटातील खासदाराने उद्धव ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते, तर तुमच्या पोराला मंत्रिपद द्यायला नव्हतं पाहिजे, असं रोखठोक मत परभणीचे खासदार बंडू जाधवांनी मांडले.
जून महिन्यात राजकीय नाट्य घडलं. एकनाथ शिंदेंनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यांना बहुमताच्या जोरावर ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्याआधीचा अडीच वर्षाचा काळ असाच गेला. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हतं. पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही खुर्ची अडवल्याने यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चूल मांडली, तर काय बिघडलं? आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली,” असं गणित मांडत खासदार जाधवांनी उद्धव ठाकरेंवरच तोफ डागली.
"उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं. अथवा कोणाला तरी अधिकार द्यायला हवे होते. ते देऊ शकले नाही किंवा स्वत:ही लक्ष दिलं नाही. म्हणून आमच्यावर हा प्रसंग ओढवला, हे सत्य आहे. त्यामुळेच ह्या चोराला संधी मिळाली. तेव्हा आम्हाला सत्तेचा लाभ व्हायला हवा होता, तो झाला नाही. याच्यासारखं दुसरं दु:ख असू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे," असं एका कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव म्हणाले.