पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांच्या इंडिया आघाडीचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांची इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. आघाडीच्या वरातीतील प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते आहे. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. याला आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. "मोदींनी त्यांच्या भाषणाने काँग्रेसला मोठे केले. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे त्यांच्या भाषणाने नक्की केले. ते सूर्याचे मालक नाहीत" असं म्हणत निशाणा साधला आहे.
सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि नरेंद्र मोदींवर मणिपूरवरून हल्लाबोल करण्यात आला आहे. "अविश्वास ठरावाच्या वेळी पंतप्रधान मोदी मणिपूरवर फक्त तीन मिनिटे बोलले. मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत? मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय?" असे सवाल विचारले आहेत.
आजच्या अग्रलेखातील मुद्देः
- मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले. ‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले. दोनेक तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत.
- आता मोदी म्हणतात, मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय?
- अविश्वास ठरावाच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले व सत्ता पक्षाची चिडचिड अनुभवता आली. संसदेतून बाहेर फेकलेले राहुल गांधींचे भाषण हे त्या चिडचिडीमागचे मुख्य कारण. दहा वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आज राहिलेले नाहीत. सत्यवचनी व बेडर गांधींसमोर मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे.
- 2014 व 2019 असा दोन वेळा काँग्रेसचा पराभव करूनही या दोघांना 2024 साली काँग्रेसची भीती वाटते व ते काँग्रेसवरच हल्ला चढवत आहेत. हे त्यांचे मानसिक दौर्बल्य आहे. मणिपूर प्रश्नावर राजकारण न करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले. मोदी यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले. त्यात 2 तास 10 मिनिटे राजकारण व उरलेली 3 मिनिटे मणिपूर होते.
- मोदी ज्या राज्यात व देशात जातात, त्या भागाशी आपले भावनात्मक नाते असल्याचे ते सांगतात. इतके भावनात्मक वगैरे नाते होतेच, तर मग मणिपुरात महिलांची नग्न धिंड वारंवार काढली जात असताना पंतप्रधान मोदींच्या भावना गोठून का गेल्या होत्या?
- मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली. काँग्रेसकडे एकच प्रॉडक्ट आहे. तेच प्रॉडक्ट ते पुनः पुन्हा लाँच करतात व दरवेळी फेल होतात. मोदी म्हणतात ते एकवेळ खरे मानले तर ते काँग्रेस व गांधींना इतके का घाबरतात? भाजपमध्ये मोदीनाम व दंगलीशिवाय दुसरे एखादे प्रॉडक्ट असेल तर त्यांनी ते बाजारात आणावे. या प्रॉडक्टची ‘एक्सपायरी डेट’ 2024 पर्यंत आहे व त्यानंतर भारताचा राजकीय बाजार पूर्णपणे बदललेला असेल.