मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश आणि महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कोरोनासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोले लगावले आहेत. सध्या उत्सवावर बंदी आहे. हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचेच दिवस धूमधडाक्यात साजरे होतात असं दिसतं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.
"एक महिना पूर्ण झाला, 100 दिवस झाले, सहा महिने झाले असे सरकारचे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरे करण्यात आले. आता मला वाटतं आहे की विरोधी पक्षनेतेपदाचे दिवसच धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत" असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सरकारचा सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला, या सहा महिन्यांच्या काळाकडे तुम्ही कसं पाहता असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. "जे काही सहा महिने या सरकारचे गेले, ते सहा महिने विविध आव्हानं घेऊन आले होते आणि आव्हानं अजूनही संपलेली नाहीत. राजकीय आव्हान ठीक आहे, जनतेचा आशीर्वाद, बळ जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी या आव्हानांची पर्वा करत नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
"सुरुवातीच्या काळात कोरोना संकट, त्याचा आकार-उकार अजूनही कोणाला उमगला नाही. नेमकेपण कोणी ओळखू शकलं नाही असं संकट आलं. आपत्ती येणं काही नवं नाही, पूर येतो, वादळ येतं, सुनामीसारखं संकट येतं जे एका क्षणात होत्याचं नव्हतं करुन जातं. करोनाचं संकट हे या सगळ्यापलिकडचं आहे. आपण जर काळजी घेतली नाही तर झपाट्याने लोक आजारी पडू शकतात आणि मृत्यूही होऊ शकतात. भूकंप, वादळ यांसारखी संकटं येऊन गेल्यानंतर आपल्याला समजतं की नेमकं किती नुकसान झालं आहे. कोरोनाचं संकट कधी संपणार कळत नाही" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून फडणवीसांना जोरदार टोले लगावले आहेत. देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत तिथे ते तेथील कोरोनाची परिस्थिती पाहत असतील. कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली ही त्यांची पोटदुखी असू शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातल्या परिस्थितीचे अपडेट्स त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून देणे कितपत योग्य आहे, अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय इकडे मी लक्ष देत नाही. मी पुन:पुन्हा सांगतो की, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठिक आहे. हे बोलतील बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत. ताप येणं हेही कोरोनाचं लक्षण आहे. काही जणांची चव जाते. म्हणजे असे वेगळे काही तरी आढळतंय का हे पाहायला हवे, राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचं आयुष्य बेचव झालेलं असून शकतं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान
डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'
कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अॅप्सवर घालणार बंदी