बदलापूरमधील एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर अक्षय शिंदे याने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर मुलीच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभं करुन ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले. याच दरम्यान या घटनेवर आता उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
"नराधमांचं सरकार आहे का?, राजकारण आहे म्हणणारेही विकृत आहेत" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सुरक्षित बहीण हे प्राथमिकता आहे. जर बहीण सुरक्षित असेल तरच लाडकी बहीण योजना ही आणता येईल. २४ ऑगस्टला महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी विनंती करतो की, आपण जात-पात, धर्म हे सर्व बाजुला ठेवून बंदमध्ये सहभागी व्हा. हा बंद माझ्या बहिणींसाठी आहे."
"आपण जागृत आहोत हे दाखवण्यासाठीचा हा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवू शकतो. उद्रेकाला वाचा फोडण्यासाठीचा हा बंद आहे. राज्यभर निषेध होत असताना मुख्यमंत्री कुठे होते? ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून ही योजना आणली आहे. पण हे विकृती आहे, दुष्कृत्य आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं यात राजकारण कधीपासून यांनी वाटायला लागलं."
"बातमी वाचण्याचं धाडस माझ्यात नाही. ही विकृती आली कुठून? मुलीच्या गर्भवती आईला १२ तास बसून ठेवलं, तिला १०२ ताप आहे, रुग्णालयात दाखल करावं लागलं. हे सरकार कोणाचं आहे, नराधमांचं सरकार आहे का? आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते कोणाच्या बाजुने आहेत?, हे असंवेदनशील सरकार आहे. जर त्यांना वाटत असेल यात राजकारण आहे तर असं म्हणणारे सुद्धा विकृत आहेत "असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.