मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. यावेळी त्यांनी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या नात्यांवरही भाष्य केले. तसेच, त्यांनी भाजपवर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुनही जोरदार प्रहार केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातून गागा भट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहोत अन् तिकडे छत्रपतींचा अपमान करणारा राज्याबाहेर जातोय. माझ्या मनात जो हेतू आहे, तो मोकळेपणाने म्हणतोय. तुमची साथ मागायला आलोय. आम्हाला युती तोडायला मजबूर केले. गळ्यात पट्टा घालून गुलामगिरी करणे आम्हाला जमत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ते शिकवलं नाही. मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणजे हिंदूत्व सोडले नाही.'
ते पुढे म्हणतात, 'आज मी तुमच्यासोबत बोलतोय तर काहीजण म्हणतील हा उत्तर भारतीयांच्या मागे लागलाय. काल-परवा नरेंद्र मोदी आले आणि बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात आपली पोळी भाजून गेले. हेच मी केले असते तर हिंदूत्व सोडले, असे म्हटले असते. त्यांचे मन मोठे आणि माझे काय...पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. त्यांनी केलं तर माफ आणि मी केलं तर गुन्हा. आम्ही काय करायचं, ते तुम्ही सांगणारे कोण? 92-93 मध्ये आणि कोरोना काळात आमच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन मदत केली. त्यांनी कधीच हिंदू-मुस्लिम किंवा मराठी-अमराठी केलं नाही.'