मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. आता पक्ष वाचवण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आता कंबर कसली असून, ते अधिकच सक्रीय झाले आहेत. ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात असून, शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोडपणे भाष्य केले.
सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. मात्र तसं बघितलं तर माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणावे लागेल. कारण मी मुख्यमंत्री बनेन असे म्हणालो नव्हतो. मुख्यमंत्री पद मला एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. कारण सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपकडून त्या नाकारण्यात आल्या. म्हणून मला ते करावं लागलं, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. यावर, हो, पण फुटिरांचा तोच आक्षेप आहे! फुटिरांचा आक्षेप हाच आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असा प्रश्न विचारण्यात आला.
झालो मुख्यमंत्री, तुम्हाला प्रॉब्लेम काय?
या प्रश्नाचे उत्तर देताना, बरं! झालो मुख्यमंत्री. कारण मी आता होऊन गेलेलो आहे. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, ‘हेल्दी पॉलिटिक्स’ करावं. आम्ही तर मित्रच होतो. 25-30 वर्षे आपण त्यांचे सोबतीच होतो. तरीसुद्धा त्यांनी 2014 ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही. तेव्हासुद्धा भाजपने शिवसेनेशी युती शेवटच्या क्षणाला तोडली होती. त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो त्यांचे 2019 ला. काय मागत होतो? मी अडीच वर्षांसाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रीपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं. ते मुख्यमंत्रीपद माझ्यासाठी नव्हतं. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद का मागितले होते? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपला केला आहे.