उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाढत चाललेला तणाव यावर उद्धव ठाकरेंनी आज भाष्य केले. गोरेगावमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी ठाकरे यांनी मी शिवसैनिकांना शांत रहा असे सांगितले नसते तर रक्तपात झाला असता, असा इशारा दिला आहे.
सध्या राज्यात बाप पळवणारी टोळी फिरतीय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, संजय राऊत एकटे लढत आहेत, मोडेन पण वाकणार नाही, असा आमचा संजय आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांचे कौतुक केले. 'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. हे काही नवीन नाहीये, आम्ही शिवरायांचा इतिहास वाचलाय. त्यावेळेसही आदिल शहा, निझाम शहा, हा शहा, तो शहा चालून आले. आताही अमित शहा येऊन गेले. देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही, इथल्या जमिनीत गवताची पाती नाहीत, तलवारीची पाती आहेत. तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दात त्यांनी शहांवर टीका केली.
कोरोना काळात दिल्लीतूनही दबाव येत होता, हे करा ते करा, मी नाही केले. कडूपणा घेतला कारण जनतेला वाचवायचे होते. कोश्यारी पत्र लिहीत होते, प्रार्थनास्थळे उघडा, आम्ही तेव्हा हॉस्पिटल उघडत होतो. शिंदेंच्या सरकारला फिरण्याची सवयच झालीय. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली. गायीच्या आतड्याला चावलेल्या गोचिड दूध नाही तर रक्त पिते, तशाच या गोचिड होत्या. फुटल्या असत्या तरी पित बसल्या असत्या, अशी टीका ठाकरे यांनी केली.
याचबरोबर ठाकरे यांनी मी शिवसैनिकांना शांत राहण्यास सांगितले नसते तर गद्दारांसोबत रक्तपात झाला असता. गद्दारच रक्त ते. हा रक्तपात झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाईचे कपडे साफ राहतील. ते होऊ द्यायचे नाहीय म्हणून मी शिवसैनिकांना शांत राहण्यास सांगितलेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून कामाला लागा. प्रत्येक शाखा उघडी असायला हवी. त्या शाखेत गटप्रमुखही असायला हवेत. अमित शहांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा. शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय, दरवाजा उघडा जायचे असेल तर आताच जा. जे मनाने नाहीत, त्यांना माझ्यासोबत कसे ठेवू. असे म्हणत गेट आऊट असे म्हटले.