मुंबई: उद्धव ठाकरेंनी भाजपचा, जनतेचा विश्वासघात केला; धोका दिला. आयुष्यात सगळे काही सहन करा पण राजकारणात धोका सहन करू नका. आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंना जागा दाखवून द्या, असा आदेश देतानाच केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबई महापालिकेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य मुंबई भाजपला दिले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
धोका देणाऱ्यांना शिक्षा दिलीच पाहिजे२०१९ च्या निवडणूक निकालानंतर अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द मोडला, असे कारण देत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा करीत अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजकारणात अन्यायाला जागा असते, पण धोक्याला अजिबात नाही. ज्यांना धोका सहन करण्याची सवय असते ते आपले स्थान कधीही मजबूत करू शकत नाहीत. जो धोका देतो त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. उद्धव यांनी आपल्याला धोका दिला. जनमताचा अनादर करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनविले. आता त्यांना जमीन दाखवा. राजकारणात सगळे सहन करा पण धोका सहन करू नका. मोदी-फडणवीसांच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेने भाजपचा आणि जनतेचाही विश्वासघात केला, असा घणाघातही शहा यांनी केला.
मुंबईवर भाजपचाच झेंडायावेळी फडणवीस, बावनकुळे व शेलार यांची भाषणे झाली. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या साथीने मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राज्यातील सत्तांतराचे सर्व श्रेय अमित शहा यांचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेने जागा पाडल्याअडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द मी उद्धव ठाकरे यांना कधीही दिलेला नव्हता, असे सांगतानाच २०१९ मध्ये युती असूनही शिवसेनेने भाजपच्या काही जागा पाडल्या असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला. -वृत्त/महाराष्ट्र
घर के सामने मारा तो...‘कही भी मारा तो चोट लगती ही है, पर घर के सामने मारा तो दिल को चोट लगती है...’ या शब्दांत शहा यांनी मुंबईच्या मैदानातच शिवसेनेला चारीमुंड्या चित करण्याचे आवाहन भाजप नेत्यांना केले.