वैष्णव यांच्याकडे हे मागणे
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचा खर्चाचा भार रेल्वे मंत्रालयाने उचलल्यामुळे मोठा दिलासा लाभला, हे उत्तम झाले. रेल्वे मार्गावरील मृत्यू कमी करण्याबाबत खा. शिंदे व वैष्णव यांच्यात काही चर्चा झाली किंवा कसे, अशी कुजबुज प्रवाशांमध्ये आहे. पंधरा डब्यांच्या लोकलची संख्या वाढवा, लोकल फेऱ्यांची संख्या वाढवा, शटल सर्व्हिसच्या पर्यायाचा विचार करा, अशा प्रवाशांच्या मनातील मागण्यांबाबत खा. शिंदे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला तर प्रवाशांचे जीव वाचतील. भिवंडीचे खा. सुरेश तथा बाळ्यामामा म्हात्रे यांच्याप्रमाणे खा. शिंदे यांनी प्रवाशांसोबत चर्चा केली तर पुढील बैठकीत तरी वैष्णव यांच्याकडे ते पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा आहे.
मनात आहे तरी काय?
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर महायुतीतील शिंदेसेनेने हक्क सांगितला आहे. पक्षाचे नवी मुंबईतील दाेन्ही प्रमुख नेते जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटा यांनी पत्रकार परिषद घेऊन दाेन्ही जागांवर दावा केल्याने भाजपचे विद्यमान आमदार गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांचे काय? कारण दोन्ही विद्यमान जागा भाजपच्या ताब्यात आहेत. विधानसभेच्या जागावाटपाची अद्याप महायुतीत बोलणी झालेली नाहीत. याबाबत चर्चाही नाहीत. असे असताना शिंदेसेनेने थेट पत्रकार परिषदेतच या जागांवर दावा केल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे.
गडकरी दखल घेणार का?
पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी जिल्ह्यातील प्रश्नांसाठी, विशेषतः मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या निकृष्ट कामाची तक्रार करण्यासाठी केंद्रीय रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या महामार्गाचे काम करणारा ठेकेदार गुजरातमधील असून तो स्थानिक प्रशासनाला जुमानत नाही, अशी स्थानिकांची भावना आहे. मात्र, ठेकेदार सर्वांच्याच तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावतो. खासदार सवरा यांनी याबाबत लोकांच्या तक्रारी केंद्रीय स्तरावर पोहोचवल्या आहेत. आता गुजराती ठेकेदाराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काळ्या यादीत टाकतील का, या प्रश्नाभोवती जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
ठाकरेंकडून चाचपणी
लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मविआ आणि महायुतीचे उमेदवार कोण? या चर्चा सर्वत्र होत असताना उमेदवारी न मिळाल्यास काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. महायुतीचा आढावा घेता निवडून आलेले काही जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, तशा हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. पण महायुतीमधीलच काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्याची चर्चा आहे. त्यांची ताकद पाहता अशांची चाचपणी उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून सुरू असल्याची कुजबुज आहे.