नागपूर - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सतत संकट येत आहेत. अवकाळी पावसाने पिके उध्वस्त होत आहेत. हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार सत्तेवर आले आहे, असा घणाघात करीत यांना सत्तेपासून खाली खेचण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वज्रमूठ’ आवळत व्यक्त केला.
महाविकास आघाडीची दुसरी ‘वज्रमूठ’ सभा रविवारी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली. सभेला जमलेली हजोरांची गर्दी पाहून आघाडीच्या नेत्यांचा उत्साह वाढला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, माजी मंत्री आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, आ. नितीन देशमुख, आ. सुनील केदार आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, राज्यात अवकाळी पाऊस काेसळत असताना मुख्यमंत्री अयोध्येला गेले. पाठोपाठ उपमुख्यमंत्रीही गेले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा झाली. ‘मेरा शर्ट तेरे शर्ट से भगवा कैसे,’ हे दाखविण्याची चढाओढ लागली आहे. आम्ही पंतप्रधान मोदींना राम मंदिरासाठी कायदा करा, असे म्हणत होतो. पण मोदी त्यावर बोलायला तयार नव्हते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर टीकोजी राव आता फणा काढून अयोध्येत जाऊन बसले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्तेची मस्ती डोक्यात गेली असला तरी, सच्चा समाजसेवकासमोर झुकावेच लागते हे महाराष्ट्राने आज संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.