ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.12 - शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे येत्या शनिवारी १५ रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाशी जागावांटपाबाबत चर्चा करतील तसेच पर्वरी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यातही मार्गदर्शन करतील.
सेनेचे राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवारी दुपारी ४.३0 वाजता त्यांचे खाजगी चार्टर विमानाने दाबोळी विमानतळावर आगमन होईल. सेनेचे खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख जीवन कामत, सहसंपर्क प्रमुख नामदेव भगत, सहसंपर्क प्रमुख आदेश परब त्यांचे विमानतळावर स्वागत करतील. तेथून त्यांचे आगमन बांबोळी येथे ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. सायंकाळी शिवसेनेच्या राज्य पदाधिका-यांची ते बैठक घेतील.
रविवारी १६ रोजी सकाळी १0.३0 वाजता पर्वरी येथे संत गाडगे महाराज सभागृहात ते शिवसैनिकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी ३ ते ४ या वेळेत भाभासुमंचे नेते सुभाष वेलिंगकर यांच्याबरोबर त्यांची आगामी निवडणुकीसाठी जागावांटबाबाबत बोलणी होईल. दुपारी ४ ते ७ या वेळेत शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांशी ते चर्चा करतील.
सोमवारी १७ रोजी दुपारी १२ वाजता ग्रॅण्ड हयातमध्ये ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असून आगामी निवडणुकीसाठी सेनेची रणनीती ते जाहीर करतील. सायंकाळी ५ वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.
दरम्यान, शिवसेनेकडे २0 मतदारसंघांमध्ये उमेदवार तयार असल्याचा दावा ताम्हणकर यांनी केला. भाभासुमंचे अर्थात गोवा सुरक्षा मंच पक्षाचे उमेदवार प्रबळ असतील तेथे शिवसेना आग्रह धरणार नाही. माध्यम प्रश्नाबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन, कसिनोंना विरोध, प्रादेशिक आराखडा, नोकर भरती हे धगधगते विषय सेनेचे प्रचाराचे मुद्दे असतील, असे त्यांनी सांगितले.
मडगांव-काणकोण मार्गाच्या राष्ट्रीयीकरणास विरोध
ताम्हणकर हे गोव्यातील खाजगी बसमालक संघटनेचेही सरचिटणीस आहेत. मडगांव-काणकोण मार्गाचे राष्ट्रीयीकरण करुन तेथे कदंबचीच सेवा देण्याच्या सरकारच्या हालचालींना त्यांनी तीव्र विरोध केला असून अखेरच्या रक्ताच्या थेंबापर्यंत हे होऊ देणार नाही, असा इशारा दिलेला आहे. प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करु, असे ताम्हणकर म्हणाले. सध्या तीन मार्गांच्या राष्ट्रीयीकरणानंतर जी गैरसोय सरकारने करुन ठेवली आहे तिचा कटू अनुभव प्रवासी घेत आहेत.