ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य करण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून चक्क पंतप्रधा मोदींची जोरदार पाठराखण केली आहे. मोदी यांच्या प्रत्येक कृतीची घासून समीक्षा करणा-या राजकारण्यांवर अग्रलेखातून टीकेची तोफ डागली आहे.
मोदी यंदाचा दसरा दिल्लीऐवजी लखनऊमध्ये साजरा करणार आहेत त्यावरुन राजकीय तर्क-विर्तक काढणा-यांना पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ शोधू नका, कोणता सण कुठे साजरा करावा हा त्यांचा प्रश्न आहे असे सांगितले आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान मोदी यांना पणास लावलेच होते व संपूर्ण केंद्र सरकार मैदानात उतरूनही भाजपचा दारुण पराभव झाला होता. हे सत्य समजून घेतले तर मोदी यांच्या लखनौ भेटीचा राजकीय लाभ होईलच असे नाही असे अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान मोदी यांना पणास लावलेच होते व संपूर्ण केंद्र सरकार मैदानात उतरूनही भाजपचा दारुण पराभव झाला होता. हे सत्य समजून घेतले तर मोदी यांच्या लखनौ भेटीचा राजकीय लाभ होईलच असे नाही. विकलांग विरोधकांमुळेच भाजपचा घोडा उत्तर प्रदेशात अडीच घरे चालेलही; पण वजिराचा मान त्याला मिळेल काय? मोदी यांचे दसर्याचे सीमोल्लंघन त्या दृष्टीने महत्त्वाचे. प्रभू श्रीरामाचा उद्धार या निमित्ताने झालाच तर हिंदूंसाठी सोनियाचा दिवस उजाडेल इतकीच माफक अपेक्षा!
- पंतप्रधान मोदी या वेळचा दसरा लखनौ येथे साजरा करणार आहेत. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावून आश्चर्य व्यक्त केले आहे. मोदी उत्तर प्रदेशात येऊन विजयादशमीचे असे कोणते सीमोल्लंघन करणार आहेत किंवा विचारांचे सोने उत्तर हिंदुस्थानींवर उधळून त्यांना खूश करणार आहेत? मोदी यांच्या प्रत्येक कृतीची अशी घासून-तासून समीक्षा करण्याचा रोग आपल्या राजकारण्यांना जडला आहे व या रोगावर एखादी जडीबुटी उपलब्ध आहे काय, याचे संशोधन रामदेवबाबा व आचार्य बालकृष्ण महाराजांनी केलेच तर बरे होईल. पंतप्रधान मोदी यांनी कोणता सण कुठे साजरा करावा हा त्यांचा प्रश्न आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वधर्मीय सण हे त्यांचेच आहेत.
- मध्यंतरी त्यांनी पाकिस्तानात अचानक उतरून त्यांनी पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चहापान केले. त्यावेळी येथील अनेकांनी हा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील ‘सण’ असल्याचे म्हटले होते आणि मोदी यांच्या हिंमतीला दाद देण्याची स्पर्धाच त्यावेळी लागली होती. मग तेच लोक मोदी यांच्या लखनौला जाऊन दसरा साजरा करण्यावर शंका का घेत आहेत? मोदी यांच्या कृतीला काहीजणांना राजकीय वास येत आहे. उत्तर प्रदेशात पुढील दोन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत व भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा म्हणून मोदींचा दसरा लखनौ येथे साजरा होत असल्याची फुसकुली काही पावट्यांनी सोडली आहे.
- या पावट्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की मोदी यांचे गृहराज्य आता गुजरात नसून उत्तर प्रदेश आहे. मोदी हे लोकसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दसर्याचा सण त्यांनी लखनौला साजरा केला तर पावट्यांचे पोट दुखायचे कारण काय? पण मोदी लखनौला येऊन थांबले तर त्यांचा राजकीय माहौल बनेल अशी भीती विरोधकांना वाटते. मोदी यांनी जरूर लखनौला यावे व लखनौमधून अयोध्येतील राममंदिर उभारणीची घोषणा करून जोरदार सीमोल्लंघन करावे. पंतप्रधान होताच मोदी यांनी वाराणसीत जाऊन गंगा-आरती केली. तसे आता अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घ्यावे व राममंदिर होणारच, अशी घोषणा करून शहीद रामसेवकांना श्रद्धांजली अर्पण करावी. आपण फक्त राजकीय फायद्यासाठी लखनौला आलो नसून राममंदिर घोषणेसाठी आलो आहोत या कृतीने विरोधकांची थोबाडे आपोआप बंद होतील.
- पंतप्रधानांनी ‘सर्जिकल’ हल्ला करून पाकिस्तानला बेहोश केले. त्यामुळे पाकिस्तान युद्धाची भाषा विसरून शांतीची पोपटपंची करीत आहे. पंतप्रधानांचे पुढचे लक्ष्य म्हणजे पाकव्याप्त कश्मीर व बलुचिस्तानचे स्वातंत्र्य आहे. पुढची दिवाळी आमच्या पंतप्रधानांनी प्रत्यक्ष बलुचिस्तानमध्ये जाऊन साजरी केली तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. अर्थात बलुचिस्तानात काही मोदींना निवडणुका लढवायच्या नाहीत हे विरोधकांनी नीटपणे समजून घेतले पाहिजे. पंतप्रधानांनी देशाच्या दुश्मनांविरुद्ध वेगवान कारवाई सुरू केली आहे व त्यांना आता कोणी रोखू नये आणि त्याचा राजकारणाशी संबंध जोडून स्वत:चे हसे करून घेऊ नये. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान मोदी यांना पणास लावलेच होते व संपूर्ण केंद्र सरकार मैदानात उतरूनही भाजपचा दारुण पराभव झाला होता. हे सत्य समजून घेतले तर मोदी यांच्या लखनौ भेटीचा राजकीय लाभ होईलच असे नाही.
- काँग्रेस पक्षाची खाट उत्तर प्रदेशात आधीच पडली आहे. मायावतींचा हत्ती पुढची चाल खेळताना दिसत नाही व समाजवादी पार्टी कुटुंबातील यादवीने डळमळीत झाली आहे. अशा विकलांग विरोधकांमुळेच भाजपचा घोडा उत्तर प्रदेशात अडीच घरे चालेलही; पण वजिराचा मान त्याला मिळेल काय? मोदी यांचे दसर्याचे सीमोल्लंघन त्या दृष्टीने महत्त्वाचे. प्रभू श्रीरामाचा उद्धार या निमित्ताने झालाच तर हिंदूंसाठी सोनियाचा दिवस उजाडेल इतकीच माफक अपेक्षा!