Uddhav Thackeray vs BJP: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्वातंत्र्यांच्या आंदोलनात कुठे होता? संघाची टोपी काळी का? असा सवाल संघाला विचारता आणि पीएफआय (PFI) वरील बंदीचे मात्र समर्थन करण्यास तुम्ही तयार नाही? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध आणि 'पीएफआय'ला इलूइलू? असा खोचक सवाल भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला केला. 'जागर मुंबई'चा अभियानांतर्गत २२ वी जाहीर सभा अंधेरी पश्चिम विधानसभेत प्रगती मैदान येथे झाली. तेव्हा त्यांनी हल्लाबोल केला.
"सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी आणली. पीएफआय, ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला धोका दिला. सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानशी ज्यांचे लागेबांधे आहेत. त्या पीएफआयवर अमित शाह (Amit Shah) नावाच्या धाडसी गृहमंत्र्यांनी छापे टाकले. पण उद्धव ठाकरे मात्र त्या निर्णयाचे स्वागत करायला तयार नाहीत. १०६ लोक पहिल्या दिवशी आणि २२७ लोकांना दुसऱ्या दिवशी अटक करून त्यांच्यावर ५ वर्षांची बंदी घातली. पीएफआयवरच्या बंदीचेही स्वागत करायला उद्धव ठाकरे तयार नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गोष्ट आली की, संघाची टोपी काळी का ? संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता का? संघाने संयुक्त महाराष्ट्रमध्ये फुट का टाकली? संघ भारतमुक्त का होऊ नये ही भाषणे उद्धव ठाकरे यांची आहेत. संघावर बंदी उपस्थित करता मग पीएफआय राष्ट्र भक्त आहे का? पीएफआयने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता का? मग त्या पीएफआयच्या विरोधात तुम्ही का नाही बोललात?" असे कात्रीत पकडणारे सवाल शेलारांनी ठाकरे गटाला केले.
"असुरांचा नाश करण्यासाठी भाजपाचा हा जागर आहे. हा जागर सत्तेसाठी नाही. समाजात तेढ निर्माण होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही 'एक भारत श्रेष्ठ भारत' मानणारे आहोत. २२ ऑक्टोबरला 'सामना'मध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही 'सबका साथ सबका विकास'ला साथ देणारे आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत," असे शेलारांनी उद्धव ठाकरे गटाला सुनावले.
"मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मग मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा. सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही," अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.