मुंबई: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट, या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनीही शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. 'भगव्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या,' असा इशाराच त्यांनी दिला.
'नोंदणीसाठी शिंदे गटाने एजंट लावले'ते पुढे म्हणाले की, 'माझा माझ्या शिवसैनिकांवर विश्वास आहे. एकनाथ शिंदे गटाने नोंदणीसाठी एजंट लावले आहेत. जेवढी सदस्य संख्या ते करत आहेत, त्याच्या दहापट सदस्य संख्या मला हवी आहे. शिवसेनेची ताकत वाढली पाहिजे, केवळ गर्दी आणि फोटो नको. कारण फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो, तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत व्हायला नको,' असा घणाघातही त्यांनी केला.
'भगव्याला हात लावला तर...''आपल्याला जिंकायचे आहे, मी कोणालाही कमी लेखत नाही. प्रतिज्ञापत्र एवढी झाली पाहिजे की, भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. सगळ्यांना वेळेवर जबाबदारी नक्की देईल. कोणालाही शिवसेनेचा भगवा हिसकावून देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या, असा इशाराही ठाकरे यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला.