"भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्यांनी आता..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 01:52 PM2023-07-09T13:52:06+5:302023-07-09T13:52:47+5:30
उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याची आक्रमक सुरूवात, राजकीय परिस्थितीवर मांडलं रोखठोक मत
Uddhav Thackeray vs BJP, Vidarbha Visit: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्णय त्यांनी नुकताच जाहीर केला होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरूवात करण्याचे ठरवले. आज यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. भाजपा हा पक्ष आता काहीही बोलायच्या लायकीचा राहिलेला नाही, असा सडेतोड पलटवारही त्यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ट्विटला दिलेल्या उत्तरादाखल त्यांनी ही भावना व्यक्त केली.
भाजपाचे बावनकुळे काय म्हणाले होते?
"सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे. उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका," असे ट्वीट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली होती.
उद्धव ठाकरेंचे भाजपाला उत्तर
"भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीये. भाजपाने आता कोणावरही दोषारोप करण्याचे सोडून द्यावं. आता त्यांनी त्यांच्या घरात घुसलेल्या बाजार बुंडग्यांचा सांभाळ करावा. दुसऱ्यांवर टीका करत बसू नये" असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दौऱ्याची सुरूवात विदर्भातूनच का?
महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात पोहरादेवीच्या दर्शनाने करण्यामागे एकच उद्देश आहे की देवीच्या आशीर्वादाने सुरूवात केली जावी. या दौऱ्यामध्ये मी जाहीर सभांचा आग्रह धरलेला नाही. कारण माझा ग्रामीण भागातील शिवसैनिक हा शेतकरी आहे. त्याला आता शेतात राबायचं आहे, त्यामुळे मी त्यांचा विचार करणारच, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी फुटीबद्दल...
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर, चिन्हावर केलेला दावा याबाबत उद्धव ठाकरेंनी मिस्कील टिपण्णी केली. आधी पक्ष फोडले जात होते. पण आता पक्ष पळवले जात आहेत. पण माझा पक्ष पळवल्यानंतरही मला लोकांचे समर्थन मिळत आहे. जागोजागी मला लोक पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. पक्ष पळवणं हा पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत असे लोक मला सांगत आहेत, असे ठाकरे म्हणाले.
आमदारांच्या अपात्रेच्या मुद्द्यावर
ठसर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दांत निकाल दिलेला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना त्या निकालाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागेल. जर त्यापेक्षा वेगळी गोष्ट घडलीच, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठवू," असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.