नाणार, रत्नागिरी - नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार. कोणत्याही परिस्थितीत हा विनाशकारी प्रकल्प कोकणात होऊ दिला जाणार नाही, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रत्नागिरीमधील नाणार येथे केली. तर नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाणार येथील प्रकल्पासाठी निर्देशित करण्यात आलेल्या भागाला भेट दिली. त्यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करतानाच सत्ताधारी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चौफेर टीका केली. कोकणच्या भूमित आमची हाडामासाची, रक्ताची नाती जोडलेली आहेत. त्यांना विकत घेता येणार नाही. हा प्रकल्प इतकाच चांगला असेल तर तो गुजरातला घेऊन जा. इथे प्रकल्प लादायचा प्रयत्न करू नका. हा प्रकल्प नाणारमध्ये नाहीच, पण महाराष्ट्रातही होऊ देणार नाही असे सांगत उद्धव ठाकरेंनी जमिनी मोजणी होऊ देऊ देऊ नका, कुणी मोजणी करायला आलाच तर त्याला शिवसेना स्टाइलने उत्तर द्या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
यावेळी येथील जमीन खरेदीमध्ये भूमाफियांचा घोटाळा झाला असून, जमीन खरेदी करणाऱ्या गुजरात्यांच्या हितासाठीच हा प्रकल्प लादण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत कोकणामध्ये प्रकल्प होऊ दिला जाणार नाही. मागे आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भाला देण्याची मागणी केली होती. तेथील लोकांची हरकत नसेल तर हा प्रकल्प विदर्भात न्या. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोकणाचे गुजरात होऊ देणार नाही. नाणारच नव्हे तर जैतापूरचाही प्रकल्प घेऊन जा. तो अहमदाबाद, सूरत, बडोद्यात कुठेही उभारा आम्ही सहकार्यच करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.कोकणाला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. अशा कोकणाला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. नाणारचा अर्धा पैसा सौदी अरेबियात जाणार, अर्धा मोदी आणि प्रधानांच्या खिशात आणि उरलेला इथल्या मोदींच्या खिशात जाणार. मग इथल्यांना काय मिळणार. कोकणी माणसांनी केवळ भांडी घासायची का तुमची, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.