मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उद्धव हे पीक विमा केंद्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अजूनही मान्सूनचं आगमन राज्यात झालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट उभं राहिलं आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा दौरा असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेने सुरु केलेल्या नांदगाव येथील पीक विमा केंद्राला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, स्थानिक शिवसेना नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. नाशिकच्या आधी ते औरंगाबाद येथील लासूर स्टेशनजवळ उभारण्यात आलेल्या पीक विमा केंद्राची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी जालना येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर कोसळलेले दुष्काळाचे संकट गंभीरच आहे. मात्र त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. दुष्काळ निवारणासाठी सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. सरकारने काहीही व कितीही केले तरी विरोधकांना ते प्रयत्न कमीच वाटतात. त्यामुळे दुष्काळप्रश्नी विरोधक काय म्हणतात याकडे सरकारने दुर्लक्ष केले पाहिजे. दुष्काळी दौरे हे विधानसभा निवडणुकांच्या तयारीचे दौरे म्हणून चालले असतील तर ते चुकीचे आहे. दुष्काळाची दाहकता तर आहेच, पण परिस्थितीचे गांभीर्य राज्य सरकारला नाही हा विरोधकांचा आरोप राजकीय आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता.
तसेच दुष्काळाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन हात केले पाहिजेत. सरकार तर काम करते आहेच, पण विरोधी पक्ष, दानशूर लोक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनीच सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत. प्रसंग बाका आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात आपण काय काम करू शकतो याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.