शिवसेना कोणाची, या प्रश्नाचे उत्तर अद्याप शिवसैनिकांना मिळालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून वेगळा गट स्थापन करत आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरु आहेत. अशा वेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगावमध्ये गटप्रमुखांची मोठी सभा आयोजित केली आहे. या सभेला ठाकरे संबोधित करणार नेमक्या त्याच वेळी शिंदेंनी मोठी खेळी खेळली आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. इथे ते महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेच ताकद किती या मुद्दा इथे नाहीय, तर शिवसेना कोणाची यासाठी जे शक्तीप्रदर्शन लागणार आहे, त्याची तयारी करण्यासाठी शिंदे हा मेळावा घेत आहेत. इकडे उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेसाठी प्रयत्न करत असताना तिकडे शिंदे शिवसेना ताब्यात घेण्यासाठी डावपेच आखत आहेत.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिंदे यांनी बोलावलेल्या मेळाव्याला राज्या राज्यांतून शिवसेनेचे पदाधिकारी आले आहेत. थोड्याच वेळात शिंदे या पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. यामुळे शिंदे यांनी महाराष्ट्रातील शिवसेना ताब्यात घेताना देशभरातील शिवसेना देखील ताब्यात घेण्याची रणनिती आखली आहे.
ठाकरेंचा पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नएकेकाळी खांद्याला खांदा लावून ठाकरे, शिंदे आणि फडणवीस काम करत होते. पण आता ठाकरे विरुद्ध सारे असे चित्र तयार झाले आहे. गटप्रमुखांचा मेळावा म्हणजे पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल, असे म्हटले जात आहे. बंडानंतर अनेक कार्यकर्ते, नेते हे शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.