मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. शिवसेनेचे ४० आमदार, १३ खासदार स्वत:च्या बाजूने वळवण्यात एकनाथ शिंदेंना यश आले. त्यातूनही सावरत ठाकरेंनी पक्षसंघटना बळकटीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यात सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. अंधारे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला भाषण शैलीत विरोधकांवर डागणारी तोफ मिळाली. अल्पावधीतच सुषमा अंधारे यांना शिवसेनेच्या उपनेतेपदी संधी दिली. आता याच सुषमा अंधारे यांना धक्का देण्याची रणनीती शिंदे गटाने आखली आहे.
सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. या राजकीय खेळीने सुषमा अंधारेंना फटका बसल्याचं मानलं जात आहे. सुषमा अंधारे या मुलुखमैदानी तोफ नसून त्यांना मीच घडवलं अशी प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारेंनी माध्यमांशी बोलताना दिली. आजचा दिवस आनंदाचा असून एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे. शिंदे यांच्या कार्यशैलीनं प्रेरित होऊन मी त्यांच्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला असं वाघमारेंनी सांगितले.
त्याचसोबत सुषमा अंधारे यांच्यासोबत कुठलेही मतभेद नाहीत. ही विचारांची लढाई आहे. त्यांना ठाकरेंचे विचार आवडले म्हणून त्या तिकडे गेल्या. मला एकनाथ शिंदे यांचे विचार आवडले. त्यांचा स्वभाव क्रांतिकारक आहे. ही विचारांची लढाई आहे. त्या तोफ वैगेरे कुणी नाही. त्यांना घडवणारा, वैचारिक परिपक्व करणारा मीच आहे. आपल्याला काम करायचं आहे. मागील ५-७ वर्षापासून आम्ही विभक्त राहतोय असं वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं.
शिवसेनेतून एकामागोमाग एक नेते पक्ष सोडून जात असताना सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले. त्यात संजय राऊतांसारखा आक्रमक नेता पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत गेला. राऊत यांच्या तुरुंगवारीत ठाकरेंची बाजू सडेतोड आणि आक्रमक शैलीत मांडून सुषमा अंधारे या शिवसेनेत फायरब्रँड नेत्या बनल्या. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ठाकरेंनीही प्रत्येक ठिकाणी सुषमा अंधारे यांना भाषणाची संधी दिली. अंधारे यांनी पंतप्रधानांपासून भाजपा नेते आणि शिंदे गटातील ४० आमदारांवर वेळोवेळी बोचऱ्या शब्दात घणाघात केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सुषमा अंधारे प्रसिद्धीझोतात आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"